Pratap Sarnaik ST Bus News: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी " मोफत वाचनालय " सुरू करणारं आहोत. या वाचनालयात मराठी भाषेतील वि.स. खांडेकर , वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे, यांच्या सारख्या प्रथितयश व लोकप्रिय साहित्यिक, कवी यांची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील, या सारख्या कादंबरीकार यांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी या वाचनालयात ठेवण्यात येतील.
मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा वाचन कट्टा
सदर पुस्तके संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांना कडे नोंद करून लोक आपल्या घरी वाचनास घेऊन जाऊ शकतात व वाचन करून परत आणून देऊ शकतात. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील. अर्थात, ही सर्व सेवा मोफत असणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे देखील दररोजच्या दररोज उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा वाचन कट्टा बसस्थानकाच्या परिसरात निर्माण होईल, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा वाचन कट्टा एसटीच्या बसस्थानकावर निर्माण करून अनमोल भेट या निमित्ताने जनतेला आम्ही देत आहोत, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.