- सप्टेंबरपासून विद्यावेतन ५ हजारांनी वाढणार
मुंबई : आपल्या विविध मागण्यांकरिता गेले दोन दिवस आंदोलन करीत असलेल्या निवासी डॉक्टरांच्या आठ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सप्टेंबर महिन्यापासून निवासी डॉक्टरांना त्यांच्या विद्यावेतनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ देण्याची मागणी मान्य झाली आहे. सध्या या निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ४३ हजार रुपये आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत गुरुवारी निवासी डॉक्टरांची चर्चा झाली होती व त्यामध्ये बहुतांश मागण्या मान्य झाल्या होत्या. शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शिनगारे यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व त्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.एमडी, एमएस झाल्यानंतर तीन महिन्यांऐवजी दीड महिन्यात या पीजीच्या विद्यार्थ्यांशी सरकार बॉन्ड करील अन्यथा सेवामुक्त केले जाईल, ज्या विषयात स्पेशालिटी केली आहे त्याच विभागात पीजी विद्यार्थ्यांना सेवा दिली जाईल, सेवा बजावताना टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांना आणि गरोदर निवासी डॉक्टरांना बाळंतपणाकरिता दोन महिने पगारी रजा देण्याचा प्रस्ताव एमसीआयकडे पाठवण्यात येईल, विद्यावेतन येत्या सप्टेंबरपासून पाच हजार रुपये करण्यात येणार आहे, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकरिता पाच महिन्यांत रुग्णालयात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येतील व सुरक्षारक्षक नियुक्त करणार, अनुसूचित जाती-जमातीकरिता मोफत शिक्षणासंबंधी बैठकीचे आयोजन करणार या मागण्या संचालकांबरोबर झालेल्या बैठकीत मान्य केल्यानंतर मार्डने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. (विशेष प्रतिनिधी)चिमुरडीचा मृत्यूडॉक्टरांच्या मास बंकचा फटका एका सहा महिन्यांच्या चिमुरड्याला बसला. योग्य उपचारांअभावी या चिमुरड्याचा बळी गेला. वेळीच उपचार न मिळाल्याने मृत पावलेल्या मोहम्मदच्या कुटुंबीयांनी केईएम रुग्णालयात हंगामा केला. मुलावर उपचार करा, अशी विनवणी करूनही केवळ संपामुळे माझ्या मुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. चिमुकल्याच्या मृत्यूने साहेल कुटुंबीय पूर्णत: कोलमडून गेले होते.