लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: मुंबई लोकलसारख्या लोकल प्रवासात महिलांना निश्चितच धोक्यांचा सामना करावा लागतो. गर्दीमुळे होणारे गैरसोयी, डब्यांमध्ये होणारी गुंडगिरी आणि छेडछाड, तसेच रात्रीच्या वेळी गर्दी नसलेल्या लोकल प्रवासात सुरक्षिततेची कमतरता या काही प्रमुख समस्या आहेत. ज्यामुळे हा प्रवास महिलांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. विरारहून दादरला संध्याकाळी ६ वाजण्याच्या लोकलमध्ये महिला डबा सुरक्षित नसल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. महिला डब्यामागील लगेचच्या डब्यात एक मनोरुग्ण तरुण दरवाज्यात टांगून महिलांच्या डब्यात पहात अश्लील शेरेबाजी करत असल्याचा प्रकार एका महिलेने धाडस दाखवून कॕमे-यात कैद केला आहे. या आंबटशौकीन मनोरुग्ण तरुणाचा वसई लोहमार्ग पोलीस आता शोध घेत आहेत.
विरारमध्ये राहणारी ३२ वर्षीय विवाहित महिला ११ सप्टेंबरला संध्याकाळी अंधेरीला जाण्यासाठी निघाली होती. विरारहुन संध्याकाळी ६ ची विरार- दादर लोकल तिने पकडली. चर्चगेटच्या दिशेने असलेल्या महिलांच्या डब्यात तुळरक गर्दी होती. मात्र मिरा रोड स्थानक गेल्यानंतर महिला डब्याशेजारी असलेल्या लगेजच्या डब्यात चढलेल्या तरुणाने महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली.खिडकिजवळ बसलेल्या तीन परप्रांतीय तरुणी या प्रकाराने घाबरून दूसरीकडे जाऊन बसल्या. त्यानंतर त्या तरुणाने रागारागाने लोकलच्या डब्याच्या पत्रावर जोरजोराने बुक्के मारायला सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे महिलांच्या डब्यात भितीचे वातावरण पसरले होते. अखेर या त्रासाला कंटाळून स्वराने आपल्या कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण केले. रेल्वे हेल्पलाईन ला देखील फोन केला. अंधेरी स्थानक येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. अंधेरी स्थानकात सदर महिलेने पुरूषांच्या डब्यातील प्रवाशांना याबाबत विचारले असता तो मनोरुग्ण असून त्याला आतमध्ये बसवल्याचे सांगितले.
सदर महिलेने शुट केलेला व्हिडिओ विरार येथील विरार मेरी जान या फेसबुक व इंस्टाग्राम आयडी असलेल्या अकाउंट वरुन पोस्ट केल्यानंतर तो काही वेळातच सगळीकडे व्हायरल झाला. विरार मेरी जान या अकाउंटच्या अॕडमीननेही पोलीसांकडे ऑनलाईन तक्रार केली होती.
समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणाचा आम्ही शोध घेत आहेत. रेल्वे डब्यातील प्रवाशांकडील चौकशीत तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. महिलेने कोणतीही तक्रार केलेली नाही, अशी माहिती वसई लोहमार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली.