दीपक भातुसे
मुंबई - महायुतीतील वादामुळे रायगड, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर या जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या बैठका रखडलेल्या असतानाच सोमवारी वार्षिक योजनांसाठीच्या बैठकादेखील होऊ शकल्या नाहीत. पालकमंत्री नसल्याने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या दोन जिल्ह्यांच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना बैठका घेतल्या नाहीत.
राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तयारीचा एक भाग म्हणून वित्तमंत्री अजित पवार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक योजनेवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेत आहेत. सोमवारी अर्थमंत्र्यांनी कोकण आणि नाशिक विभागाच्या बैठका घेतल्या. मात्र,पालकमंत्री नसल्याने रायगड आणि नाशिकच्या बैठका झाल्या नाहीत.
एकनाथ शिंदेंची दांडीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. मात्र ते बैठकीला येणार नसल्याचा निरोप आल्याने या दोन जिल्ह्यांची बैठक पुढे ढकलल्या. शिंदे बैठकीला का येऊ शकले नाहीत याचे कारण समजू शकले नाही. दोन आठवड्यांपूर्वी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. गेल्या आठवड्यात वॉर रूमच्या बैठकीला देखील ते अनुपस्थित होते.
... तर विभागीय आयुक्त नेतृत्व करू शकतातराष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील मूळ नियुक्तीला शिंदे सेनेच्या नाराजीनंतर स्थगिती देण्यात आली होती. सध्याच्या नियमानुसार, जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यास, विभागीय आयुक्त पालकमंत्र्यांच्या जागी जिल्ह्याचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या बैठका होणार आहेत. मुंबई शहर, ठाणे आणि आहिल्यानगर जिल्ह्यासाठीही बैठकाही याचवेळी होतील.