कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर तृप्ती अवधूत माळवी यांना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात खासगी स्वीय साहाय्यकासह १६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. महापालिकेच्या मालकीची जागा देण्याच्या ठरावावर सही करण्यासाठी त्यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. गेल्या सात महिन्यांपासून तृप्ती माळवी महापौर आहेत. रस्ता रुंदीकरणात गेलेल्या जागेच्या मोबदल्यात महापालिकेची काही जागा पाटील नावाच्या एका व्यक्तीला देण्याचा ठराव झाला होता. त्यावर सही करण्यासाठी महापौर माळवी यांनी संबंधित व्यक्तीकडे ४० हजारांची मागणी केली होती. त्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. शुक्रवारी पाटील ठरल्याप्रमाणे सायंकाळी पैसे घेऊन महापालिकेत गेले व तेथून त्यांनी महापौर माळवी यांना फोन लावला. माळवी यांनी त्यांचे स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी यांना पैसे घेण्यासाठी पाठवून दिले. पण१६ हजारच असल्याचे पाटील यांनी सांगितल्याने महापौरांनी त्यांना थेट आपल्या केबिनमध्येच बोलावले. तिथेच १६ हजाररुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या महापौर ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By admin | Updated: January 31, 2015 05:06 IST