नागपूर : औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपा युतीने संयुक्तपणे लढविली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बैठकीत सूत्र ठरले असून, युतीचाच महापौर होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मंगळवारी दिली. शिवसेनेचे नगरसेवक संख्येने अधिक असल्याने पहिले दीड वर्ष त्यांच्याकडे महापौरपद राहील. त्यानंतर एक वर्ष भाजपाचा महापौर असेल. पुढील अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेचा महापौर असेल. उपमहापौरपद चार वर्षे भाजपाकडे तर एक वर्ष शिवसेनेकडे राहील. स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वर्षे भाजपाकडे तर दोन वर्षे शिवसेनेकडे राहणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे भूसंपादनाविरोधात आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
औरंगाबादमध्ये युतीचाच महापौर
By admin | Updated: April 29, 2015 01:43 IST