माथेरान : सलग चार दिवस सुट्टय़ा आल्याने मुंबई पुण्यापासून जवळचे माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे. परिसरातील लॉजिंग तसेच हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले. बहुतांश पर्यटकांनी अगोदरच हॉटेल तसेच लॉजिंगचे आरक्षण केले होते. चार दिवसांच्या सुट्टीतील संधीचे सोने करण्यासाठी दुकानदार, रेस्टॉरंट तसेच लहान मोठे स्टॉलवाले पर्यटकांच्या सेवेसाठी तत्पर दिसत आहेत. हातरिक्षा, घोडे यांचीही मोठय़ा प्रमाणावर वर्दळ पॉईंटला दिसत असून पॉईंटची सैर पर्यटक करीत आहेत.
दस्तुरी नाक्यावर पार्कीगसाठी जागा अपुरी असल्यामुळे एक कि.मी. र्पयत गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गावातील लॉजिंग हाऊसफुल्ल झाल्याने माथेरानला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. चार महिने मिनीट्रेन बंद असते. फक्त माथेरान ते अमनलॉज शटलसेवा सुरु असते. मिनीट्रेनमध्ये या दहा मिनीटांच्या प्रवासासाठी देखील पर्यटकांची गर्दी रेल्वे स्थानकात दिसत आहे. काही प्रवाशांनी प्रवासाचे मोजके पैसे आणलेले असल्यामुळे पैसे काढण्यासाठी येथील एटीएम सेंटरमध्ये लांबच लांब रांगा दिसत आहे. (वार्ताहर)