रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यात २०० एकर जागेत ५० कोटी खर्चाची मेरीटाईम युनिव्हर्सिटी उभारली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून, सर्व प्रकारचे सागरी अभ्यासक्रम येथे सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीसाठी मंत्री गीते येथे आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दापोलीतील ही मेरीटार्ईम युनिव्हर्सिटी आपल्या रत्नागिरी-रायगड मतदारसंघात होत आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली चर्चाही झाली आहे. त्यांनी त्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी २०० एकर जागाही मिळाली आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये सागराशी संबंधित मरिन इंजिनियर ते कॅप्टन असे सर्व प्रकारचे पदवी अभ्यासक्रम तसेच मर्चंट नेव्हीचाही त्यात समावेश राहणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठविला जाणार आहे. यानंतर कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचाही मानस आहे, असेही ते म्हणाले. कोकणात प्रदूषण कमी असलेले मोठे उद्योग यावेत, अशी जनतेचीच मागणी आहे. त्यामुळे असे मोठे उद्योग आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. (प्रतिनिधी)गुहागरमध्ये रिफायनरी प्रकल्प होणारगुहागर तालुक्यातील तवसाळ भागात तीन हजार एकर जागेत दोन टप्प्यातील ४४ हजार कोटी खर्चाचा तेलशुध्दीकरण प्रकल्प (रिफायनरी प्रोजेक्ट) उभारला जाणार आहे. मेरीटाईम युनिव्हर्सिटीप्रमाणेच गुहागर तालुक्यातील तवसाळ परिसरात ३ हजार एकर जागेत बीपीसीएल व इंडियन आॅईल यांच्यामार्फत संयुक्तरित्या हा प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. त्यातील प्रत्येक टप्प्याचा प्रकल्पीय खर्च २२ हजार कोटी रुपये आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ३ ते ४ वर्षे चालणार असून, प्रकल्प उभारणीसाठी १५ ते २० हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे. रिफायनरी सुरू झाल्यानंतर त्यात ५ हजार कामगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना प्रशिक्षण देणारतेलशुध्दीकरण प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा, तांत्रिक कौशल्याची कामे मिळावीत म्हणून कोणते प्रयत्न केले जाणार असे विचारता गीते म्हणाले, जिंदाल प्रकल्पाच्यावेळी अभियंत्यांची गरज लक्षात घेऊन ४८ स्थानिकांना प्रकल्प उभारणी होईपर्यंत अभियांत्रिकीचे प्रशिक्षण दिले गेले. सर्व ४८ जणांना जिंदालमध्ये सेवेत घेण्यात आले आहे, हे समोर असलेले उदाहरण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक कुशल कामगारांची आवश्यकता भासणार असून, प्रकल्प क्षेत्रातील मुलांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना कंपनीत सामावून घेतले जाणार आहे.
दापोलीत होणार ‘मेरीटाईम युनिव्हर्सिटी’
By admin | Updated: June 30, 2015 00:24 IST