देवपूजा करून घराबाहेर धूर लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून सरकारी अधिकारी असलेल्या परप्रांतीय व्यक्तीने सोसायटीमधील मराठी रहिवाशांना दमदाटी करून गुंडांना बोलावून मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोन्हीकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी अधिकारी असलेल्या अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीने १० ते १२ जणांच्या गुंडांचं टोळकं बोलावून सोसायटीमधील तीन जणांना मारणाह केली. या मारहाणीत अभिजित देशमुख, धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले आहेत.
कल्याण पश्चिममधील योगीधार परिसरात अजमेरा हाईट्स नावाची इमारत आहे. येथे पीडित मराठी कुटुंबीय आणि अखिलेश शुक्ला हा अधिकारी शेजारी राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या कुटुंबीयांकडून रोज पूजा केल्यानंतर घराबाहेर धूप जाळण्यात येत असे. या धुपाच्या धुराचा त्रास होत असल्याने कविलकट्टे यांनी अखिलेश शुक्ला यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखिलेश शुक्ला यांने ऐकून न घेता दमदाटी केली. तसेच मराठी माणसं ही घाणेरडी असतात, म्हणून शिव्याशाप दिले.
त्यानंतर १० ते १२ जणांच्या टोळक्याला बोलावून कविलकट्टे यांना मारहाण केली. यावेळी अभिजीत देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता सदर परप्रांतिय अधिकाऱ्याने त्यांनाही मारहाण केली.