लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकीच्या आधी मराठीमराठी करायचे आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसाला विचारायचे कोण रे तू? यांना फक्त स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा इतकेच माहिती आहे. धारावीत आज लोक खितपत पडले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही पुनर्विकास प्रकल्प आणत आहोत तर त्याला विरोध, आम्ही टिकणारे काँक्रिटचे रस्ते करतोय तर त्यात भ्रष्टाचाराचे आरोप, आमच्यावर आरोप जरूर करा पण रस्त्यांच्या कामांचे लेखापरीक्षण सुद्धा करा, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उद्धवसेनेवर नाव न घेता केली.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी उद्धवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, आधीच्या सरकारने फक्त पात्र लोकांना धारावीत घरे देण्याचा निर्णय घेतला. आम्ही पात्र-अपात्र सगळ्यांना घरे द्यायचा निर्णय घेतला. धारावी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून रेल्वेची जागा मिळाली असून तिथे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. आम्ही जमीन विकासकाला देत नसून डीआरपी म्हणजे धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टला देतोय. त्या लोकांचे जीवनमान बघा, मग ठरवा की त्याला विरोध करायचे की नाही.
‘तोंड उघडले तर कोणाचा मोरया होईल ते बघा’कोविड काळात खिचडी घोटाळा कोणी केला? डेडबॉडी बॅग चोर कोण? दरवर्षी रस्ते दुरूस्तीचे टेंडर देणारे कोण? टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा व्हेंडर कोण ते आधी बघा? मिठीतला गाळ काढण्यासाठी दिनो मोरिया दिसला, पण मराठी माणूस दिला नाही. जर त्या दिनोने तोंड उघडले तर कोणाचा मोरया होईल ते बघा, असा चौफेर हल्ला शिंदे यांनी चढवला.
आमचे सरकार येण्याआधी सगळे प्रकल्प ठप्प होते. आम्ही सागरी किनारा मार्ग, अटल सेतू पूर्ण केला. काँक्रीटचे टिकाऊ रस्ते केले. जरूर रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करा, असे आव्हान शिंदे यांनी यावेळी दिले.
गालिबचा शेर अन्...‘उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा’ हा शेर ऐकवत शिंदे यांनी इथे तुमच्या डोळ्यातच धूळ आहे, ती साफ करा, असा टोला लगावला.