पाटण (जि.सातारा) : राज्यातील विद्यमान सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत काही ज्येष्ठ वकील मंडळींनी माझ्याकडे शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी, अन्यथा धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले, ‘गत आॅगस्टमध्ये झालेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्या घटना दुरुस्तीमधील ‘२३४ बी’ नुसार राष्ट्रपती शैक्षणिक आणि सामाजिक निकषांनुसार निर्णय घेऊ शकतात. ती घटनादुरुस्ती सरकारने लक्षात घेतली नसावी, अशी शंका राज्यातील काही ज्येष्ठ वकील मंडळींनी माझ्याकडे व्यक्त केली आहे. आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून, तो कायद्याच्या कसोटीवर टिकावा याची खबरदारी सरकारने घ्यावी.’आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. देशातील सर्व घटक पक्ष आघाडीसोबत येण्यास तयार असल्यामुळे ही आघाडी निश्चित होईल. तसाच प्रयत्न राज्यपातळीवर व्हावा, यासाठी विविध पक्षांच्या अध्यक्षांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले. ते माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यासाठी पाटण येथे आले होते.‘निवडणुकीपूर्वी भाजपाने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असा शब्द दिला आहे. मात्र, दिलेला शब्द न पाळता त्यांनीच धनगर समाजाची फसवणूक केली आहे, असा पलटवारही त्यांनी केला.गांधी घराण्याचे पवारांकडून कौतुकमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. गांधी घराणे देशाची सेवा करण्यात कुठेही मागे पडलेले नाही.असे असूनही पंतप्रधान मोदी त्यांच्यावर तोंडसुख घेत आहेत, हे कितपत योग्य आहे? असा सवाल करुन पवारांनी गांधी घराण्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे...महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत दोन्ही काँग्रेसची बोलणी सुरू आहे. ४० जागांवरची बोलणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय झाला आहे. उर्वरित ८ जागांबाबत प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहेत. राज्यात ज्या जागा पक्षाने जिंकल्या आहेत. त्या जागा त्याच पक्षाकडे राहणार आहेत.
आरक्षणावरून मराठा समाजाची फसवणूक होण्याची शक्यता - पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:28 IST