Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या मुंबईत केलेल्या आंदोलनाला यश आले आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढले. मराठा आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. सरकारने काढलेले जीआर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ओबीसी नेते आक्रमक झाले असून, जीआर विरोधात न्यायालयात जाण्याचा तसेच मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे कौतुक केले जात आहे. मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’ झाला असून, काही नेते विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. यातच मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही
मनोज जरांगे पाटील स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. मराठा आरक्षणाचा हा जगन्नाथाचा रथ आहे. मनोज जरांगे पाटील यांचा असा समज असा आहे की, मी हा एकटाच जगन्नाथाचा रथ ओढतो. मनोज जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. जरांगे मराठा समाजाच नाही तर कुणबी समाजाच नेतृत्व करत आहेत. जरांगेची एक ही मागणी वैध कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. कायदा आणि शासन आदेश, पुराव्याचा शासन आदेश, यातला फरकच मनोज जरांगे यांना कळत नाही. हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही, या शब्दांत डॉ. संजय लाखे पाटील यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मराठा समाजाने मनोज जरांगेंवर केवळ फुलांवर १०० कोटी रुपये उधळले. मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवत आहेत. त्यांना स्वतःच्या पुढून कॅमेरा जायला नको असे वाटते. चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून ते मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट मनोज जरांगे यांना अगोदरच माहीत होता. केवळ ड्राफ्ट वाचून सरकारचा जयजयकार करून गुलाल उधळला गेला. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा अजेंडा ते राबवत आहेत, असा निशाणा साधण्यात आला.