जालना - २५ जानेवारी २०२५ ला तुफान ताकदीने घराघरातील मराठ्यांनी अंतरवालीला या. नोकरदार, शेतकरी सर्वांनी मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन अंतरवालीत यावे. मराठा समाजाच्या बैठका सुरू करा. कुणीही घरात राहू नका. राज्यभरातील कानकोपऱ्यातील मराठ्यांनी लेकराबाळासह अंतरवालीत यावं. मराठ्यांचे भगवं वादळ उसळू द्या असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी करत पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
अंतरवालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २५ जानेवारीला एकानेही लग्नाची तारीख धरू नये. सगळा मराठा समाज अंतरवालीकडे येणार आहे. त्याच ताकदीने मराठा वादळ उसळणार आहे. २५ जानेवारीला माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. २४ जानेवारीलाच रात्री गोरगरिब मराठा समाज इथं जमणार आहे. त्यामुळे २५ जानेवारी २०२५ च्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा. मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला गुडघे टेकायला लावणार. २५ जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही मराठा समाजाची तुम्ही बेईमानी केली तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
तसेच तुमची मध्यस्थी असो किंवा अन्य काही आम्ही ऐकून घेणार नाही. सगेसोयरे यांच्या अधिसूचनेला २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतंय अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅझेट लागू केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिले नाहीत. मराठा-कुणबी एकच हादेखील अध्यादेश काढला नाही. त्यामुळे २५ जानेवारीपासून उपोषणाला सुरूवात करतोय. मराठा समाजाने २५ जानेवारीपर्यंत सगळी कामे आटपून घ्यावीत. जितके दिवस आपल्याला बसावे लागेल तितके आपण बसूया असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण घेईपर्यंत अंतरवालीतून उठायचं नाही. मराठा समाजाचे जे लोक इथं अंतरवालीत येणार त्यांनी येताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन या. अंथरूण पांघरूण घ्या. कितीही श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला तरी हॉटेलवर जायचे नाही. जेवायला जायचं नाही. पाण्याची व्यवस्था करून घ्यायची. गोरगरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. जेवण इथं स्वत:चं करायचं. ज्यांना उपोषण करायचं त्यांनी करा. ज्यांना नाही करायचं त्यांनी पाठिंबा द्यायला या. घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करू नका. मी इथं मरायला खंबीर आहे. तुम्ही खूप एकजूट दाखवली. मी समाजाच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही. मी कधीच गद्दारी करणार नाही. कधी मॅनेज होणार नाही हा माझा शब्द आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
"माझा शेवटही होऊ शकतो"
मला उपोषण आता सहन होत नाही. मी महाराष्ट्राचे दौरे करून आलो तर मला ४ दिवस आराम करावा लागला. सलाईन घ्यावे लागले. माझे खूप हाल आहेत. वेदना आहे. माझा शेवटही होऊ शकतो. माझा मराठा समाज सांभाळा. मी मागे हटणार नाही. शरीर साथ देत नाही. पहिले मी ८-१५ दिवस उपोषण करू शकत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही हाल होणार आहेत. मला आत्ताच उठता बसता येत नाही. त्यामुळे माझे प्रचंड वेदना आहेत. या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. कुटुंबाला सांगतो, मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आवाहन आहे.