मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे दुसऱ्यांदा मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. अशातच सरकारने मराठा आंदोलकांना अन्न, पाणी मिळण्याचे मार्ग बंद केल्याचा आरोप केला जात आहे. सार्वजनिक शौचालय, पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. दुकाने, हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे मराठा आंदोलक मुंबईतील रस्ते बंद करून आंदोलन करत आहेत. अशातच आज सुट्टी असूनही उच्च न्यायालयाने जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेत आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावे, इतरत्र फिरत बसू नये, तसेच मंगळवारी सायंकाळपर्यंत मुंबईतील रस्ते खाली करावेत. आंदोलकांना बाजुला करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. तुमच्या लेकरांसाठी मी लढत आहे. मी मेलो तरी चालेल पण आंदोलन करणारच आणि आरक्षण घेणारच असे सांगत रस्त्यावर गोंधळ न घालता शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडावेत अशा सूचना जरांगे यांनी रस्त्या रस्त्यांवर असलेल्या मराठा आंदोलकांना दिल्या. तसेच जे आंदोलक आहेत त्यांनी आझाद मैदान सोडू नये, तिथेच रहावे. पार्किंगची सोय असलेल्या ठिकाणी गाड्या लावाव्यात असे ते म्हणाले. आंदोलन बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे पालन करणार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. ज्याला ऐकायचेच नाहीय त्याने गावाकडे गेले तरी चालेल, अशा शब्दांत जरांगे यांनी सुनावले आहे.
सरकारच्या बैठकांबाबत मी पत्रकारांकडूनच ऐकतोय. सरकारच्या लोकांनी इथे चर्चेला यावे. आंदोलकांनी मैदानात जावे, तिथेच गाड्या लावाव्यात. मला दोन दोन घोट पाणी पिऊन तुमच्याशी बोलावे लागत असेल तर तुमचा काय उपयोग, असा सवाल जरांगे यांनी केला. अंतरवालीतही हेच आंदोलक होते. मुंबईला आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये असे वागा. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायचे हे षडयंत्र आहे. दोन-चार वेळा हे केलेले आहे. माझ्या नादाला लागू नका, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.