मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता वाहनांचा ताफा आझाद मैदानाजवळ धडकला आणि श्री गणरायाच्या आरतीनंतर उपोषण आंदोलन सुरू झाले. अटल सेतु, ईस्टर्न फ्री-वे मार्गे मिळेल त्या वाहनाने हजारो आंदोलक मुंबईत येत होते. एकाच वेळी शेकडो वाहने दाखल झाल्याने मुंबईतील अनेक भागांत सकाळचे काही तास चक्काजाम झाल्याची स्थिती होती. त्यानंतर मुंबईचा मराठा समाजाच्या आंदोलकांनी ताबा घेतल्याची स्थिती होती.
पावसाचा जोर अन् सीएसएमटीकडे मोर्चामैदानात एकीकडे आंदोलन झाले, तर दुसरीकडे महापालिका मुख्यालयासमोरही हजारों आंदोलक जमले होते. त्यातच काही वेळ पावसाचा जोर वाढल्याने आंदोलकांनी सीएसएमटीकडे मोर्चा वळविला. संपूर्ण स्टेशन आंदोलकांनी भरून गेले होते. आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प होते की काय अशी स्थिती झाल्याने जरांगे पाटील यांनी आंदोलकांना ५० किमीवर जाऊन थांबवण्याचे, तसेच लवकरात लवकर मुंबई सोडण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धवसेना यांचे आमदार व खासदार जरांगे पाटील यांना भेटून गेले. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाने मांडलेली भूमिका आणि विरोधकांचे आरोप यामुळे मराठा आंदोलनाची मुंबईवर दिवसभर छाया होती.
आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ...आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी दिलेल्या परवानगीला शनिवारी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, जरांगे यांनी आंदोलनापूर्वी दिलेल्या हमीपत्रातील अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्याने शनिवारी तसे होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी त्यांना दिल्या आहेत.मनोज जरांगे यांनी दिलेल्या हमीपत्रात वाहतुकीला अडथळा आणणार नाही. वाहनतळाचा वापर आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करू, आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवेन आणि त्यात वाढ होणार नाही. यासह आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती चिथावणीखोर भाषण करणार नाही यासह पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर निर्देशांचे पालन करतील अशा २० अर्टीची हमी दिली होती. मात्र, शुक्रवारी या हमीचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.पाच हजारांपेक्षा जास्त संख्येने गर्दी जमली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहने अडवली. वाहने आझाद मैदानापर्यंत पार्क करण्यात आली. चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी या गोष्टी होणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत, तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही कडेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे.