महेश पवारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: सातारा संस्थान व हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देत असल्याचे तत्काळ जाहीर करा. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देऊन त्यांच्या हातून प्रमाणपत्र द्या. मराठा समाजाला कुणबी घोषित करा. शनिवार-रविवारच्या आत काही झाले नाही तर महाराष्ट्रातील एकही मराठा घरात दिसणार नाही. कायदा करण्यासाठी मुंबईत विधानभवन, विधानसभा, विधानपरिषद अस्तित्वात नाही का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सरकारला केला.
सातारा संस्थानचे गॅझेटिअर तत्काळ लागू करा. औंध संस्थान व बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटसाठी दोन महिन्यांची वेळ देऊ. शिंदे समितीने १३ महिने अभ्यास करून अहवाल तयार केला. शिंदे समितीचा अभ्यास संपला असून सरकार वेळकाढूपणा करत आहे. आम्हाला राजकारण नको तर आरक्षण हवे आहे. मात्र, मुख्यमंत्री राजकारण करत असून आरक्षण देण्यास टाळत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.
हिशेब होणारच... पालिकेला इशारामहापालिकेने आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स, खाऊगल्ल्या बंद केल्या. बाथरूममध्ये पाणी नाही. पालिकेत सध्या प्रशासक असून यामागे त्यांचा हात आहे. वेळ कायम एकसारखी राहत नाही. कधी ना कधी बदल होतोच त्यावेळी सगळा हिशेब केला जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा जरांगे पाटील यांनी पालिकेला दिला
अभ्यासक, तज्ज्ञ, वकिलांनी भेटावे सातारा संस्थान व हैदराबाद गॅझेटवर अभ्यास असणारे अभ्यासक, तज्ज्ञ, वकील किंवा जे कुणी असतील त्यांनी रविवारी दुपारी १२ वाजता भेटायला यावे. मुंबई काही दूर नाही त्यामुळे ही वेळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलकांसाठी वानखेडे मैदान द्यामुंबईत १० किलोमीटरच्या अंतरावर अनेक मैदाने आहेत. त्यातील वानखेडे मैदान आंदोलकांना झोपण्यासाठी द्या अशी मागणी त्यांनी केली. आपण शांततेने राहून सरकारने दिलेल्या मैदानांवर गाड्या लावा, असे त्यांनी मराठा आंदाेलकांना सांगितले. बीपीटी ग्राउंड, शिवडी, वाशी येथे वाहनांची व्यवस्था करा. संपूर्ण मुंबई मराठा बांधवांनी व्यापली असून त्यांनी काहीही गैर वागणूक करू नये आणि आपल्या नावाला बट्टा लावू नये, असेही आवाहन त्यांनी केले.