Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मुंबईत पाच दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेल्या गरीब मराठा बांधवांनी शांततेत आणि संयम दाखविला. मुंबईतील एकाही व्यक्तीला कोणीही त्रास दिला नाही. सर्व जण शांततेत गेले आणि परतलेही, याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा मला नाही तर गरीब मराठ्यांचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत येऊन तळ ठोकला. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी हजारो लोक मुंबईत आले. मुंबईत पर्यटनही केले. मंत्रिमंडळ उपसमितीने मसुदा तयार करून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. जीआर काढून आश्वासन पूर्ण केले. मनोज जरांगे यांनी उपोषणाला अखेर यश आले. मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. सरकारने काढलेले जीआर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली असून, हा हिट फॉर्म्युला अमलात आणत अशाच प्रकारचे आंदोलन करण्याची तयारी काही आंदोलनांच्या बाबतीत सुरू झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
जरांगे यांचा फॉर्म्युला 'हिट'
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनासाठी गावाहून तयार जेवण, चार-पाच दिवस टिकेल असा शिधा, पाणी अशी पूर्ण तयारी केली होती. आता असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न अन्य काही नेते करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू यांनी भंडारा शेतक-यांच्या सभेत मुंबईला आंदोलन करण्याचे आवाहन केले. गाड्यांसाठी वर्गणी काढा, प्रत्येकाने दोन-पाच किलो तांदूळ, गहू घ्या, आठ दिवसांच्या आंदोलनाच्या तयारीने मुंबईला जाऊ, असे सांगितले. धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनीही 'पुनर्वसन धारावीतच करा' या मागणीसाठी मराठा आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे नेत्यांना नवा फॉर्म्युला सापडला असेच दिसते.
दरम्यान, मुख्यमंत्री साहेब, दलित-मुस्लिमांना एक उपसमिती करा. शेतकऱ्यांसाठी एक उपसमिती पाहिजे. शेतकऱ्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. आदिवासी समाजासाठीही एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे? मायक्रो ओबीसींसाठीही एक समिती असायला पाहिजे. त्या गरिबांचेही प्रश्न सुटतील ना, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.