मुंबई : महिला व बालविकास मंत्रालयाच्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे पुरावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवले.मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महिला व बालविकास मंत्रालयातील गैरव्यवहार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे इतर प्रकरणांप्रमाणेच या खरेदीचीही खुली चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सावंत म्हणाले, या खरेदीतील गैरव्यवहाराचे सर्व पुरावे मंत्रालयात उपलब्ध असताना मुख्यमंत्री हेतुपुरस्सर विरोधकांकडेच पुरावे मागत आहेत. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही पुरावे सादर केले आहेत. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सर्वप्रथम महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी सावंत पुढे म्हणाले की, एसीबीने खात्याच्या सचिवाकडून माहिती मागवणे अयोग्य आहे. अन्य प्रकाराप्रमाणे एसीबीने मुख्य सचिव किंवा गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना खुल्या चौकशीची मागणी करायला हवी होती. (प्रतिनिधी)
२०६ कोटींच्या खरेदीची खुली चौकशी करा - काँग्रेस
By admin | Updated: July 1, 2015 02:07 IST