ऑनलाइन लोकमतलासलगाव (नाशिक), दि. 13 - लासलगांवसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये विक्री होणा-या शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यासाठी येथील व्यापारी वर्गास रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या प्रायमरी मार्केट असल्याने येथे प्रामुख्याने शेतक-यांचा शेतीमाल विक्रीस येतो. बाजार समिती कायद्याप्रमाणे शेतीमालाचे वजन झाल्याबरोबर शेतीमाल विक्रीची रक्कम मालधन्यास रोख स्वरूपात अदा करावी लागते. मात्र केंद्र शासनाच्या दि. 08 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या राजपत्रानुसार चलनातील रू. 500/- आणि 1,000/- च्या नोटा रद्द करण्यात आल्याने व बँकांमधुन रोख रक्कम काढुन घेण्यासाठी निर्बंध लावण्यात आल्याने येथील व्यापारी वर्गास बँकेतुन रोख रक्कम काढण्यास मर्यादा आल्यामुळे व्यापारी वर्ग दैनंदिन शेतीमाल लिलावात सहभागी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार गेल्या 03-04 दिवसांपासुन नाईलाजास्तव बंद ठेवण्यात आले आहे.चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद राहिल्यास येथील शेतक-यांची माल विक्रीची गैरसोय होत असुन चलन पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास दि. 15 पासून शेतीमाल लिलावाबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. लासलगाव बाजार समितीतील व्यापारी वर्गास शेतीमाल विक्रीची रक्कम वाटप करण्यासाठी दररोज साधारणतः सव्वा ते दिड कोटी रूपयांची आवश्यकता भासते. एकट्या नाशिक जिल्ह्यात 17 बाजार समित्या कार्यरत आहे. त्यामुळे शासनाने सदर प्रश्नी तांतडीने लक्ष घालुन ज्याप्रमाणे प्रवासी वाहतूक, हॉस्पिटल व मेडिकल, टपाल व वीज वितरण इ. अत्यावश्यक सेवा म्हणुन सदर ठिकाणी जुन्या चलनी नोटा स्विकारणेस व त्या बँकेत भरणा करणेस मान्यता दिलेली आहे. त्याच धर्तीवर शेतीमाल खरेदी-विक्री करणा-या व्यापारी वर्गास सुरळीत चलन पुरवठा होईपावेतो जुन्या चलनी नोटा वापरण्यास मान्यता द्यावी अथवा शेतीमाल विक्री रक्कम रोख स्वरूपात वाटप करणेसाठी त्यांच्या बँक खात्यावरील रोख रक्कम काढण्याचे निर्बंध उठविण्यात यावे.
शेतीमालासाठी व्यापाऱ्यांना रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 17:39 IST