- मुरलीधर भवार कल्याण - आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात अय्यप्पा मंदिरासमोर रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावर भले मोठे झाड कोसळले. ही घटना रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. रिक्षातून प्रवास करणारे दोन प्रवासी आणि रिक्षा चालक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे कल्याण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही घटना घडतात महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. वीज पुरवठा खंडित असल्याने अग्निशमन दलाला रिक्षावर पडलेले झाड दूर करण्यात अडथळे येत होते. इलेक्ट्रॉनिक पर्वतीच्या साह्याने रिक्षावर पडलेले झाड कापून दूर करण्यात आले. रिक्षात अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिघेही मृत असल्याचे घोषित केले. दोन पुरुष आणि एक महिला मृत्युमुखी पडली आहे.
घटनेची माहिती मिळताच मदत कार्यासाठी शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे, पदाधिकारी प्रशांत काळे, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी घटनास्थळी घेऊन पाहणी केली. रिक्षावर पडलेले झाड हटवण्यासाठी स्क्रीन किंवा जेसीबी तातडीने उपलब्ध झाला नाही, अशी तक्रार स्थानिकांनी यावेळी केली.