Ladki Bahin Yojana E-KYC Update Process: महायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक सडकून टीका करत असले, तरी महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरल्याचे विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील १५०० रुपये यापुढेही मिळत राहावे, असे वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की २६.३४ लाख बहिणींचे मानधन हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आले आहे. याचा अर्थ या सर्व बहिणी कायमस्वरुपी अपात्र ठरलेल्या आहेत असे नाही. त्यांच्यापैकी छाननीअंती ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नियमितपणे दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाईल. या योजनेत २६.३४ लाख लाभार्थींचे मानधन रोखण्यात आले असले तरी २.२९ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यापोटी सरकार साडेतीन हजार कोटी रुपये महिन्याकाठी खर्च करीत आहे. यानंतर आता लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले.
ई-केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक
पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात १८ सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून, असे प्रमाणीकरण न करणाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्याचा इशारा विभागाने दिला आहे. या योजनेचा राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी-अधिकारी; तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही लाभ घेतल्याचे उघड झाले होते. यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आले.
e-KYC कसे करणार? सगळी प्रक्रिया पाहा
Ladki Bahin Yojana e-KYC करण्यासाठी काही सोप्या प्रक्रिया करता येऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
- e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
- आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.