लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नसला तरी विविध राजकीय पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती होईल पण इतरत्र महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढतील असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडीमनसेसह एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेस मनसेसह शिवसेनेसोबतही जाण्यास तयार नसल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. भाजपसह विविध पक्षांच्या बैठका सध्या तयारीसाठी सुरू असून तीत वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत आहेत. आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नाही असे आम्हाला सांगितले गेले आहे, असे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. आयोगाने मात्र अजून नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी, याचा निर्णय केलेला नाही. मात्र, त्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे.
खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, आयोगाने आता विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यादृष्टीने मते मागविणे सुरू केले आहे. अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठे नुकसान राज्याच्या ग्रामीण भागात झाले. त्यामुळे तेथे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही. म्हणूनच आयोगाने आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्यायही तयार ठेवला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती आदी प्रकारची जी पूर्वतयारी करावी लागते ती नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी करण्यावर आयोगाने भर दिला आहे.
शिवसेना-मनसेसोबत जाऊ नये : सपकाळ
राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस जाणार नाही असा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. त्यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात रोखठोक भाष्य केले. शिवसेना-मनसेसोबत जाऊ नये अशी नेते, कार्यकर्त्यांची भावना आहे. नेतृत्वासोबत बसून यावर चर्चा होईल. ज्याक्षणी निवडणूक जाहीर होईल तेव्हायाबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा...
अंदाज असा आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि शेवटी साधारणतः जानेवारीअखेर महापालिकांची निवडणूक होईल. या कारणामुळे नगरपालिका निवडणूक आधीराज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील सर्व प्रकारची मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी जवळपास २० दिवस लागणार आहेत.
या मदतीला आचारसंहितेचा फटका बसायचा नसेल तर आधी नगरपालिका निवडणूक घेणे हे सत्तारुढ महायुतीच्या दृष्टीनेही सोयीचे असेल. मदत आपत्तीग्रस्तांना पूर्णतः पोहोचण्याआधी ग्रामीण भागाशी संबंध असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेतली तर नाराजीचा फटका हा महायुतीतील घटक पक्षांना बसू शकेल.
निकाल एकत्र की वेगवेगळे ?
नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण, आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकांवर होऊ शकतो असा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग यादृष्टीने काय निर्णय घेते, याबाबत उत्सुकता असेल.
Web Summary : Maharashtra's political parties gear up for municipal elections, potentially preceding Zilla Parishad polls. Alliances shift, with Congress distancing itself from Shiv Sena and MNS. The decision hinges on disaster relief progress and potential impact on upcoming elections.
Web Summary : महाराष्ट्र के राजनीतिक दल नगरपालिका चुनावों की तैयारी कर रहे हैं, जो संभावित रूप से जिला परिषद चुनावों से पहले हो सकते हैं। कांग्रेस ने शिवसेना और एमएनएस से दूरी बनाई है। निर्णय आपदा राहत प्रगति और आगामी चुनावों पर संभावित प्रभाव पर निर्भर करता है।