- गणेश देशमुख
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील जाहिरात घोटाळ्याचे प्रकरण सोमवारी विधानसभेत गाजले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत आमदार विकास ठाकरे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर घोटाळेबाज संस्थांना सहकार्य करणाऱ्या माहिती खात्याच्या तत्कालीन संचालकाविरुद्ध फाैजदारी कारवाईचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. ‘लोकमत’ने हा घोटाळा उघड केला होता.
श्री ओम ॲडव्हर्टायझर्स प्रा. लि., मुंबई आणि राकेश ॲडव्हर्टायझिंग, मुंबई यांनी राज्यातील बसस्थानकांवर आणि बसगाड्यांवर शासनाच्या विविध योजनांच्या जाहिराती प्रकाशित न करता, आगार प्रमुखांच्या बनावट स्वाक्षऱ्या करत काम पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे तयार करून हा घोटाळा केला. परिवहन खात्याच्या चाैकशीत दोन्ही संस्था दोषी आढळल्या. माहिती व जनसंपर्क खात्याचे तत्कालीन संचालक अजय आंबेकर यांनी दोषी संस्थांना पुन्हा कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली.
जाहिरातींसाठी निधी देणाऱ्या समाजकल्याण खात्याने ‘लोकमत’च्या बातम्यांनंतर दोन्ही संस्थांविरुद्ध पोलीस तक्रारी केल्या. मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. घोटाळेबाज संस्थांना जाणीवपूर्वक कंत्राटे देणारे, तसेच कार्यादेश नसतानाही बेसिल नामक संस्थेला देखरेखीचे नियमबाह्य काम देणारे तत्कालीन संचालक अजय आंबेकर यांच्याविरुद्ध फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली. आंबेकर हे चाैकशीत दोषी आढळल्याचेही त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.
‘त्यांना’ अमेरिकेतून परत आणाआंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्तीनंतरही त्यांनी कर्मचाऱ्यांचे ‘सीआर’ कार्यालयात बसून लिहिले. त्याचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. आता ते अमेरिकेत आहेत. त्यांच्याविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था करा, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली. गृहमंत्र्यांनी आंबेकर यांच्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले.
माहिती व जनसंपर्क विभागातील जाहिरात भ्रष्टाचाराबाबत माहिती द्यावी, चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. -दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री