लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/पिंपरी: राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये राजकीय हस्तक्षेप, दादागिरी यामुळे अस्वस्थता आहे. राजकीय नेत्यांनी औद्योगिक परिसरात आपल्या टोळ्या पोसल्या असून त्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.
दुसरीकडे उद्योगांनी वारंवार अनेक मागण्या करूनही त्यातील एकही पूर्ण केली जात नसल्याचे चित्र असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या मुद्यावरील अस्वस्थता हिंजवडी आयटी पार्क (जि.पुणे) येथे पहाटे केलेल्या दौऱ्यात बघायला मिळाली. प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून कायमच दुर्लक्षित राहिलेले हिंजवडी आयटी पार्क येथून अनेक कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने आता राजकीय नकाशावर येऊ लागले आहे. तेथील उद्योजकांच्या तक्रारी, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी यावरून अस्वस्थ झालेले अजित पवार यांनी हिंजवडीच्या दौर्यात खडेबोल सुनावले.
‘रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना सरळ करा, जर अजित पवार आडवे आले तरी गुन्हा दाखल करा,’ असे त्यांनी प्रशासनाला बजावले. हिंजवडीत २५० कंपन्या आणि ४ लाख कामगार आहेत, आजूबाजूच्या परिसरातही आयटी कंपन्या वाढल्या आहेत. हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनकडून १७ मागण्यांचे पत्र सरकारला देण्यात आले पण काहीही झाले नाही. दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. राजकीय नेते राजकीय समिकरणे समोर ठेऊन औद्योगिक क्षेत्रात विकासकामांनाही विरोध करत असल्याची बाब हिंजवडी आणि राज्यात इतरत्रही निदर्शनास येत आहे.
आमचे कामगार घ्या, आम्ही सांगू त्यांनाच काम द्या
औद्योगिक वसाहतींच्या परिसरातील लहानमोठे नेते हे उद्योगांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने कोणी काही करू शकत नाही. नव्याने आलेल्या आणि आधीपासून असलेल्या कंपन्यांनीही आपल्याच एजन्सीमार्फत कामगार/नोकरभरती करावी इथपासून तर काही बांधकाम करायचे असेल तर कंत्राट आपण सांगू त्यालाच दिले पाहिजे असा दबाव कंपन्यांवर आणला जात आहे. मंत्रालयात थेट संबंध असलेले नेते वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्यांसाठी कोट्यवधी रुपये मागतात असेही चित्र आहे.
...अन् उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले
अजित पवार यांनी हिंजवडीत पाहणी करून आढावा घेताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबाेल सुनावले. जांभुळकर यांनी रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले, “धरणं करताना त्यात मंदिरं जातात की नाही? तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. मी ऐकून घेतो. मला काय करायचं ते मी करतो. आपलं वाटोळं झालं! आयटी पार्क हिंजवडी, पुणे आणि महाराष्ट्रातून बाहेर बंगळुरू, हैदराबादला चाललंय. तुम्हाला काही पडलेलं नाही. मी बघतोय. कशाला मी सहा वाजता येतो? मला कळत नाही? विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा.”
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस.
हा अनुभव अंबरनाथचा
अंबरनाथमध्ये एमआयडीसीने उद्योगांना प्लॉटवाटप केले आहे पण कंपनीची उभारणी करायची तर स्थानिक राजकारण्यांचा त्रास प्रचंड होतो. परिसरातील दोन्ही राजकीय गट उद्योजकांना वेठीस धरत आहेत. फाईन ऑरगॅनिक केमिकल कंपनीला दहा एकर जागा मंजूर झाली आहे पण स्थानिक गटबाजीमुळे त्यांना प्रकल्पाची उभारणीच करता येत नाही. - उमेश तायडे, अध्यक्ष, ॲडिशनील अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.