Maharashtra Politics ( Marathi News ) : दिशा सालियान ( Disha Salian ) मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज सभागृहात या प्रकरणारुन चांगलाच गोंछळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ अटकेची मागणी केली.
आज सभागृहात दिशा सालियान ( Disha Salian ) मृत्यू प्रकरणाची मंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करु, असे योगेश कदम यांनी म्हटले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अटकेची मागणी केली. सतीश सालियन यांनी मविआच्या काळातील मंत्र्यावर आरोप केले. त्यामुळे त्या नेत्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे न्याय लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
यावेळी नितेश राणे यांच्या मागणीला शिवसेनेतील मंत्री शंभूराज देसाई यांनीही पाठिंबा दिला. देसाई म्हणाले, नितेश राणे म्हणता त्याप्रकारे सामान्य माणसाला जो न्याय लागतो, तोच नियम माजी मंत्र्याला लावला पाहिजे. त्यामुळे मंत्रिमहोदयांनी आरोपीला तात्काळ अटक करुन चौकशी करावी, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली.
संजय गायकवाड यांनी ठाकरेंची पाठराखण केली
आज माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, दिशा सालियान ( Disha Salian ) प्रकरणात सीआयडीच्या तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय.कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण मागची तीन वर्षे आमचेच सरकार सत्तेवर होते, असंही संजय गायकवाड म्हणाले.