Maharashtra Municipal Election Results 2026: आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहूमत मिळवले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचाही समावेश आहे. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई मनपात 'कमळ' फुलले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आणि आपल्या विजयी उमेदवारांना मोलाचा संदेशही दिला.
आजच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यालयातून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्यातील 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येत आहे. विशेषतः सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मनपात महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन जनतेकडे गेलो आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला. रेकॉर्डब्रेक मँडेट हे दाखवते की, लोकांना विकास, प्रामाणिकपणा आणि स्थिर नेतृत्व हवे आहे.'
बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी
फडणवीस यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत म्हटले, 'या विजयामागे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. या निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.'
हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाहीत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'ज्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवली, त्या मुद्द्यांना जनतेने पाठिंबा दिला. आमचा पुढचाही अजेंडा विकासाचाच असेल. मात्र आमच्या कार्याचा आत्मा हिंदुत्ववादी आहे. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आमचे हिंदुत्व संकुचित नाही, तर व्यापक आहे. जो या देशाच्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, तो आमच्यासाठी हिंदू आहे. आमच्या हिंदुत्वात सर्वांचा समावेश आहे.'
कार्यकर्त्यांना संयम आणि जबाबदारीचा संदेश
देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देताना सांगितले, 'एवढे मोठे समर्थन मिळाल्यावर अधिक जबाबदारीने वागावे लागेल. कोणताही उन्माद होता कामा नये. जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देऊ नका. प्रामाणिकपणे कारभार करा. निवडून आलेल्या उमेदवारांना एकच सांगणे आहे, जनतेने अपेक्षेने निवडून दिले आहे. मोदीजी आणि भाजपच्या विश्वासावर निवडून दिले आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये. प्रामाणीकपणे कारभार करावा. एवढे मोठे समर्थन जेव्हा मिळते, तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे.'
कार्यकर्त्यांचा हा विजय- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, 'आज भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बूथ पातळीवर मेहनत घेऊन पक्षाला यशाच्या दिशेने नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नसली तरी त्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका निभावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, तसेच आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली गेली आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिला.
Web Summary : After a historic win in Maharashtra's municipal elections, Devendra Fadnavis credited Balasaheb Thackeray's blessings and PM Modi's development agenda. BJP secured a majority in most corporations, including Mumbai, emphasizing Hindutva and development.
Web Summary : महाराष्ट्र नगर निगम चुनावों में ऐतिहासिक जीत के बाद, देवेंद्र फडणवीस ने बालासाहेब ठाकरे के आशीर्वाद और पीएम मोदी के विकास एजेंडे को श्रेय दिया। बीजेपी ने मुंबई सहित अधिकांश निगमों में बहुमत हासिल किया, हिंदुत्व और विकास पर जोर दिया।