लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल साेमवारी (दि. ५) दुपारी १ वाजता लागणार असल्याचे जाहीर केले. अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन निकाल पाहता येईल. निकाल मनासारखा लागेल, याची खात्री बाळगा. नाही लागला तरी नाराजी कशाची?
मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, त्याचे प्रिंट आउट घेता येईल. तसेच डिजिलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय केलेली आहे.
निकालानंतर गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
निकाल कसा पाहावा?विद्यार्थ्यांनाे, सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे गेल्यावर ‘HSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका. त्यानंतर ‘Submit’ बटणवर क्लिक करा.
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य काही संपत नाही!
मित्रांनाे, तुमच्यासह पालक व नातेवाइकांचेही डाेळे निकालाकडे लागले आहेत. पण, एक लक्षात ठेवा ! खूप मार्क पडले म्हणून हुरळून जाऊ नका आणि नापास झालात म्हणून खचू नका. बारावी किंवा दहावीत नापास झालं म्हणून काय आयुष्य थाेडंच संपतं. पास-नापास याच्याही पलीकडे जगात खूप काही करण्यासारखे आहे. ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणताे ताे सचिन तेंडुलकरदेखील बारावीत अर्थशास्त्र विषयात नापास झाला हाेता. मराठी सिनेसृष्टीत स्वत:चे गारुड निर्माण करणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेदेखील दहावीत नापास झाला हाेता. जाे काही निकाल हाती आला असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वाटचाल निश्चित करा, असे आवाहन ‘लाेकमत’ आपल्याला करत आहे.
येथे पाहा निकाल (अधिकृत संकेतस्थळ)
https://results.digilocker.gov.in
महाविद्यालयांसाठी
https://mahahsscboard.in (in college login)