कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढूया, असं सांगत राज्यांना हे करीत असताना राज्यांनी लॉकडाऊन टाळावेत, तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं आवाहन केलं होतं. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं. "पंतप्रधानांनी हेच सांगितलं की राज्यांसाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. आज महाराष्ट्रात जर दररोज कोरोनाबाधितांची संख्या ७० हजारांपर्यंत जात असेल तर तो शेवटचा पर्याय म्हणून नक्कीच आपल्याला विचार करावा लागतोय. मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांना तसंच सर्व समाजघटकांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं होतं. बऱ्यापैकी गोष्टी आपण ब्रेक द चेनच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या निर्बंधांद्वारे बंद केल्या आहेत," असं राजेश टोपे म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. ब्रेक द चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांत आणखी निर्बंध वाढवले जातील आणि ती आजच्या काळाची गरज असल्याचंही टोपे म्हणाले. जिथे मिळेल तिथून लस आणून लसीकरण करणार"जगात नेहमीच या गोष्टी यशस्वी ठरल्या आहेत. ब्रिटनमध्ये कालच्या तारखेत केवल दोन मृत्यू झाले. याचं कारण म्हणजे त्यांनी तीन महिने लॉकडाऊन ठेवला आणि देशातील ६० टक्के लोकांचं लसीकरण करून घेतलं असं उदाहरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिलं. हर्ड इम्युनिटी त्यांच्यात आली आहे. तसंच त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही नगण्य आहे. आपल्यालाही तिच स्ट्रॅटजी अवलंबावी लागेल. पुढील १५ दिवसांत कडक लॉकडाऊन करायचा आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचं," असंही ते म्हणाले. ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचं लसीकरण केंद्रच करणार आहे. लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि पुढे आणण्याचं काम आपण करू. १८ ते ४५ वर्षा वयोगटातील नागरिकांसाठी केंद्रानं लसीकरणाची जी जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवली आहे त्याचंदेखील आव्हान आपण स्वीकारू. देशात किंवा देशाच्या बाहेर जिथून मिळेल तिथून लस घेऊन आपण लसीकरण करून. त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही टोपे म्हणाले.आणखी काय म्हणाले होते मोदी?"कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे. परंतु आरोग्य यंत्रणा, योग्य योजना, पुरेसा औषध पुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करूया. लोकांचे साहस, शिस्त आणि त्यांचे प्रयत्न याद्वारे आपण कोरोनाविरोधात लढूया. देशात ऑक्सिजन उत्पादन आणि सर्वांना पुरवठा यासाठी सर्वतोपरी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करू," असंही मोदी आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले होते.
... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 15:03 IST
Maharashtra Lockdown : राज्यांनी लॉकडाऊन टाळावा आणि तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले होते.
... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे
ठळक मुद्देराज्यांनी लॉकडाऊन टाळावा आणि तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले होते.राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.