अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात डेंग्यूने थैमान घातले असून, मुंबईत एका डॉक्टरचा यात बळी गेल्याने जनतेत मोठ्या प्रमाणावर भीती पसरलेली आहे. १९ जिल्ह्यात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीने आजपर्यंत ३१ लोकांचे बळी घेतले आहेत. बळींची वाढती संख्या पाहून शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. डेंग्यूमुळे महानगरपालिकांच्या हद्दीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २१ झाली असून, ग्रामीण भागात आजपर्यंत १० बळी गेले आहेत. सगळ्यात मोठी लागण मुंबईत असून, आजपर्यंत ६९६ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून, मुंबईत डेंग्यूने ७ बळी घेतले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागाचा अनागोंदी कारभार यामुळे चव्हाट्यावर आला असून पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, मीरा-भार्इंदर, धुळे, औरंगाबाद महानगरपालिकांच्या हद्दीतही हीच अवस्था आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढते़ साचलेले पाणी वेळीच न साफ केल्याने तसेच परिसर कोरडा न ठेवला गेल्याने डेंग्यूची पैदास वाढत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकाऱ्यांनी दिली. काही वृत्तवाहिन्या डेंग्यूचे ७२ बळी असे वृत्त चालवत आहेत, ते चुकीचे आहे. प्रत्यक्षात ३१ मृत्यू आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग यासाठी गतीने कामाला लागला असून, सर्वत्र यासंबंधीची औषधे देखील पुरवण्यात आल्याचे संचालक सतीश पवार यांनी सांगितले. २०१२ पासून या आजाराने राज्यभरात ३१८ बळी घेतले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, मुंबईत सध्या २२७ फवारणी यंत्रांद्वारे धूर फवारणी केली जात आहे, अशी माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
महाराष्ट्र डेंग्यूच्या विळख्यात!
By admin | Updated: November 8, 2014 04:08 IST