मुंबई - राज्यातील जलसंपदा विभागात मोहित कंबोज यांच्याशिवाय पानही हलत नाही. जलसंपदाचा विभागाचा कुठलाही निर्णय मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय होत नाही असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि दानवे यांच्यात वाद झाला, तेव्हा मोहित कंबोज तुमचे जावई आहेत का असा सवाल दानवेंनी विचारला.
विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दानवे म्हणाले की, आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहित कंबोज घेतो. दीपक कपूर नावाचे अधिकारी मोहित कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत. मंत्र्यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच हा मोहित कंबोज कोण आहे, ग्रामीण भागातील मोठमोठ्या धरणाचे प्रश्न, पाटबंधारे, पाण्याचा प्रश्न असतील त्याचे निर्णय मोहित कंबोज घेतो. याची चौकशी व्हायला हवी. मी पुरावे देईन, मोहित कंबोज जलसंपदा विभाग चालवतात. मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचे संभाषण तपासा, सीडीआर तपासा. कंबोज यांना सांगितल्याशिवाय महाराष्ट्रातील कुठले निर्णय होत नाहीत. माझा बोलण्याचा अधिकार आहे. कुठल्याही मंत्र्यांवर माझा आरोप नाही. मी त्या विभागाच्या कारभारावर बोललो आहे. या प्रकाराची चौकशी सरकारने करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, मी बोलतोय जे जबाबदारीने बोलतोय. कोणकोणत्या कामात मोहित कंबोजने काय केले हे सांगू का, फार पुढे गेले तर सगळ्या गोष्टी लफडं होईल. एखादे मंत्री, अधिकारी बोलतात हे समजू शकतो, पण मोहित कंबोज कोण आहे? त्याचा संबंध काय, माझ्या भाषणावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात खडाजंगी
मोहित कंबोज यांचं नाव घेतल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दानवेंच्या भाषणात सभागृहात असं नाव घेऊ शकत नाही म्हटलं. त्यावर दानवे संतापले, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलतो, मला पुरावे मागतील त्यांना देईन, तुम्ही पुरावे मागणारे कोण, माझे भाषण रोखण्याची तुम्हाला कुणी परवानगी दिली, मोहित कंबोजचं नाव का घेऊ शकत नाही, तो तुमचा जावई आहे का, सभागृहाच्या सदस्यांचं नाव घेऊ शकत नाही परंतु बाहेरच्याचं काही बंधन नाही. बाहेरच्या कुणाचं नाव घेण्यासाठी मला बंधन नाही. हे सगळे रेकॉर्डवर घ्या असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.