"इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट"; विरोधकांनी घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 08:51 PM2024-03-01T20:51:47+5:302024-03-01T20:53:54+5:30

मी काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढत राहीन, अशी विजय वडेट्टीवारांची ग्वाही

Maharashtra Budget Session 2024 Vijay Wadettiwar slams Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar government | "इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट"; विरोधकांनी घेतला खरपूस समाचार

"इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट"; विरोधकांनी घेतला खरपूस समाचार

Maharashtra Budget Session 2024: पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर ठोस उत्तर देता आले नाही. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहां' आहे. 'इजा-बिजा-तिजा सरकार' महाराष्ट्राला उद्धवस्त करणारं त्रिकूट असल्याची घणाघाती टीका विधानसभा विरोधी  पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच, मी काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढत राहीन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मुंबईत पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, "अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर ठोस अशी उत्तरे देता आली नाहीत. मुख्यमंत्र्यांचे भाषणावेळी अवसान गळाले होते. भाषणात मोदी महिमा एवढाच मुख्यमंत्री शिंदेंचा अजेंडा राहिला. मोदी गुणगाण गाऊन निवडणुकीला सामोरे जाणे एवढेच त्यांनी ठरवलेले आहे.  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले , राज्यातील बळीराजा संकटांनी पिचला असून या बळीराजासाठी अर्थसंकल्पात काहीही ठोस तरतूद केली नाही. आताही विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गारपीट, अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु सरकारने मदतीचे केवळ आश्वासन दिले आहे. आचार संहिता येत्या काही दिवसात लागणार आहे. या आचार संहितेच्या आत सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक हे सरकार करणार आहे.लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं, अशी या सरकाची प्रतिमा आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केला जात आहे. कापसाला हमीभाव मिळावा, सोयाबीनला भाव नाही. कांदा निर्यात बंदी बाबत सरकारकडून उत्तर नाही. या सरकारनं शेतकऱ्याला देशोधडीला लावले."

"विदर्भात गारपीट झाली, त्यांना काहीही दिले नाही. विदर्भातील प्रश्न, शेतकऱ्याबद्दल अनास्था, घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराला ऊत, दलित, आदिवासींवर अन्याय, मुस्लीमांवर अन्याय,  ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे.   दलित, आदिवासी, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. ड्रग्ज, गुटखा यांतून महिन्याला कोट्यवधींची  उलाढाल होत असून  यात मंत्री, त्यांचे बगलबच्चे, मंत्र्यांचे जावई सामील आहे. सामाजिक न्याय विभागाचे बजेट २८ टक्क्यांनी कमी केले आहे . यांचे राजकीय थडगे महाराष्ट्रातील जनता बांधेल. नाशिक स्मार्ट सिटी ४० कोटी रुपयांचा घोटाळा मर्जीतील लोकांना कंत्राट, त्यातून टक्केवारी, लूट आणि लुटीची स्पर्धा सरकारमध्ये सुरु आहे," असा टोला त्यांनी लगावला.

"विदर्भाच्या अुनशेषासाठी केवळ दोन हजार कोटी रूपयांची तरतूद करून विदर्भाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली आहेत. विदर्भाला सापत्न वागणूक नेहमीच दिली जाते. इजा - बिजा - तिजा  सरकारनं  विदर्भाच्या तोंडाला पाने पुसली  असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात  महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारी पैशातून मतं मिळविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. सूरतच्या साड्या दिल्या जाणार आहेत. गुंडांच्या राज्यात महिलांना साड्यांसोबत शस्त्र द्या असे सभागृहात सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सरकारची वक्रदृष्टी आहे. स्पर्धा परीक्षा मंडळाला कंत्राटी कर्मचारी भरण्यास सांगितले आहे. दाओसमध्ये तीन लाख कोटींचे करार केले. मात्र गेल्या वर्षी दाओसमध्ये केलेल्या करारांचे काय झाले. गुंतवणुक कुठे गेली. किती लोकांना रोजगार मिळाला. याची आकडेवारी सरकार देत नाही," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र उद्धवस्त करणाऱ्यांच्या फौजेत सामील होणार नाही. कोणी पुड्या सोडतो, कोणी चर्चा करते. महाराष्ट्र उध्वस्त होताना त्या फौजेत सहभागी होणार नाही. काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढेल, जिथे आहोत तिथेच इमानदारीने काम करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Budget Session 2024 Vijay Wadettiwar slams Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.