Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यातच ज्या ईव्हीएमच्या जोरावर लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झालेल्या नीलेश लंके यांनी आता विधानसभा निवडणुकीत मात्र ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.
मीडियाशी बोलताना नीलेश लंके म्हणाले की, अनेक मतदारसंघात झालेली मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आहे, त्यात तफावत पाहायला मिळाली. काही ठिकाणी तर विरोधकांचे बुथही नव्हते किंवा कोणी पोलिंग एजंट नव्हता. त्या ठिकाणीही मताधिक्य मिळालेले आहे. हे सगळे शंकास्पद आहे. त्यामुळेच बाबा आढाव हे ९५ वर्षांचे असूनही त्यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. तसेच अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे लंके म्हणाले.
काही तज्ज्ञ लोक आहेत. त्यांनी खूप धक्कादायक माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या कंपनीला हे काम दिले, त्या कंपनीवरील पदाधिकारी भाजपाशी संबंधित आहेत. तीन पैकी एक संचालक भाजपाचा गुजरातमधील माजी जिल्हाध्यक्ष आहे. एक बिहारमधील कुठला तरी होता. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. अशा काही गोष्टी समाजापुढे येत आहेत. मला जिथे हजाराचे मताधिक्य मिळणे अपेक्षित होते, तिथे फक्त १०० ते १५० चे मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे हे सगळे शंकास्पद आहे. अनेकांनी सांगितले की, आम्ही मतदानच केले नाही, मग एवढे मतदान झालेच कसे, असा प्रश्न नीलेश लंके यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील अशा अनेक ठिकाणी दिग्गज मंडळींचा तांत्रिक गोष्टींमुळे पराभव झाला आहे, असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.