महामंडळ घेणार होते राजीनामा! - श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

By admin | Published: January 9, 2016 04:21 AM2016-01-09T04:21:44+5:302016-01-09T04:21:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या

Mahamandal was going to resign! - The scandal of Shripal Sabnis | महामंडळ घेणार होते राजीनामा! - श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

महामंडळ घेणार होते राजीनामा! - श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

Next

श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट : जीव गेला तरी राजीनामा देणार नसल्याची स्पष्टोक्ती
राहुल कलाल / प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. जीव गेला तरी मी पदाचा राजीनामा देणार नाही. अशी माघार घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधानांबाबतच्या वक्तव्यानंतर उठलेला वाद आणि सनातन संस्थेच्या वकिलांनी केलेले ‘ट्विट’ या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘साहित्य महामंडळाच्या तटस्थ भूमिकेचे, छुप्या विरोधाचे आश्चर्य वाटते. संमेलनामध्येही भाषणाबाबत मला निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, मी लोकशाही मार्गाने निवडून आलेलो आहे. समाजातील घडामोडींबाबत व्यक्त न होणे मला मान्य नाही. मी कोणत्याही एका विचारसरणीचा पुरस्कर्ता नाही. मी चुकीला विरोध करणारा आणि सत्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे स्पष्ट मत व्यक्त करण्याला मी घाबरत नाही. विचार परखडपणे व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे. ’’
संमेलनाच्या आमंत्रणासाठी सबनीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. देवेंद्र फडणवीस सार्वजनिक कार्यक्रमांसाठी २ दिवस पुण्यात होते. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. संमेलनाच्या उद्घाटनाला ते येणार की नाही, याची चर्चा आहे.
श्रीपाल सबनीस कालपासून घराबाहेर पडलेले नाहीत. आज आकाशवाणीवर नियोजित मुलाखत असतानाही घरी येऊनच मुलाखत घ्या, असे त्यांनी सांगितले. काल रात्रीपासून विविध संस्था-संघटनांचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यास जात आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत सबनीस म्हणाले, ‘‘मी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने अनेक दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, दुर्दैवाने, पांढरपेशा म्हणविल्या जाणाऱ्या समाजातून कोणी साधा चौकशीचा फोनही केलेला नाही.’’
राजीनाम्यातला ‘र’ही काढला नाही
सबनीस यांनी कुठल्या आधारावर हा आरोप केला आहे, याची माहिती नाही. महामंडळ म्हणून संमेलनाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही. राजीनाम्यातला ‘र’ही उच्चारलेला नाही. सबनीस यांनी हे विधान कुठल्या आधारावर केले, याची माहिती मी देऊ शकत नाही. याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच समजू शकते. संमेलन ठरल्याप्रमाणे नियोजनबद्ध आणि संस्मरणीय होईल.
- डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
गाढवावरून धिंड... सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने संमेलनस्थळी त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली.

Web Title: Mahamandal was going to resign! - The scandal of Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.