महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना होत्या. चौकशीनंतर सगळं समोर येईल, असे एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी समिती नियुक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकनाथ शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या? काय होत्या? याबाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती. त्यामुळे त्यावर एसआयटी नेमणूक करण्यात आली. एसआयटी स्थापन झालेली आहे. एसआयटीचा अहवाल येईल आणि सविस्तर माहिती मिळेल.
प्रविण दरेकरांचा नेमका आरोप काय?
'वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकावण्याचा प्रयत्न झाला होता. फार मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं. याचसंदर्भात मला तपशीलवार माहिती मिळाली. विविध वाहिन्यांच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन झाले होते, ती माहिती. मी नागपूरच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित केला होता', असे प्रवीण दरेकरांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा आणि सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त ढवळे, एक पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे.
अबू आझमींच्या विधानावरही शिंदे संतापले
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून... त्यांना ४० दिवस छळ करून ज्यांनी मारलं, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं अतिशय दुर्दैवी आहे. जितका निषेध करू तितका कमीच आहे. खरं म्हणजे अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे", अशी मागणी शिंदेंनी केली.
"औरंगजेब चांगला प्रशासक होता. त्याचं कौतुक करणं, हे तर महापाप आहे. म्हणून अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे", अशी मागणीही एकनाथ शिंदेंनी केली.