यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांची ‘जादू’ कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 02:31 AM2020-11-18T02:31:09+5:302020-11-18T02:31:19+5:30

मागणी ४० टक्क्यांनी घटली : कमी किमतीची भुरळ मात्र कायम

The 'magic' of Chinese products is less this Diwali | यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांची ‘जादू’ कमी

यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांची ‘जादू’ कमी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेमुळे उत्सवकाळात चिनी वस्तूंच्या खरेदीस संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिनी वस्तू खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट झाली.
सर्वेक्षणात सहभागी ७१ टक्के लोकांनी जाणीवपूर्वक चिनी वस्तू खरेदी केल्या नाहीत, असे उत्तर दिले. तर, या वस्तू खरेदी करणाऱ्यांपैकी ६१ टक्के लोक कमी किमतीमुळे चिनी वस्तूंकडे आकर्षित होत असल्याचे समाेर आले.


भारत-चीन सीमेवर २० भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर चीनच्या विरोधात असंतोष उफाळून आला. भारतातील पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये चिनी कंपन्यांची नाकाबंदी, चिनी ॲप बंद करणे यासारखे आक्रमक धोरण सरकारने स्वीकारले. त्यानंतर सर्वसामान्यांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी विविध स्तरांवर व्यापक मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने उत्सवकाळात खरेदी करणाऱ्या सुमारे १४ हजार लोकांची मते अजमावली, त्यातून ही माहिती हाती आली.

स्वस्त उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य
२९ टक्के लोकांनी चिनी उत्पादने खरेदी केल्याचे मत नोंदविले. ही उत्पादने स्वस्त आणि मस्त असल्याने त्यांना पसंती दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे स्वस्त उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१९ साली याच प्रश्नावर लोकल सर्कलने एक सर्वेक्षण केले होते. त्या वेळी ४८ टक्के ग्राहकांनी चिनी वस्तू खरेदी केल्याचे सांगितले होते. यंदा ते प्रमाण ४० टक्क्यांनी घटले.

Web Title: The 'magic' of Chinese products is less this Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.