पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची लॉटरी उद्या (दि. ३०) काढण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून आॅनलाइन पद्धतीतून यंदाची प्रवेशप्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यासाठी ७८१ शाळांनी नोंदणी केली आहे आणि या आरक्षित जागेतून प्रवेश मिळविण्यासाठी १६ हजार ८९४ विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. ही लॉटरी हडपसर येथील अॅमेनोरा पार्क येथील पवार पब्लिक स्कूल येथे सकाळी ११ वाजता काढणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.ते म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील एकूण ७८१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्या शाळांमधील पहिलीसाठी १० हजार ९८८ जागा, तर पूर्वप्राथमिकच्या ५ हजार ९०६ जागांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक लागेल त्यांना संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचित करण्यात येईल. त्यानंतर एका आठवड्यामध्ये संबंधित शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाइन फॉर्म भरतेवेळी स्कॅन केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर करून प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेशासाठी आॅनलाइन स्कॅन केलेल्या कागदपत्रांची मूळ कागदपत्रे संबंधित शाळांमध्ये सादर करणे बंधनकारक असणार आहे. पहिली आणि पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी काही अडचणी आणि तक्रारी असतील, तर पुणे महापालिकेची १५ तक्रार निवारण केंद्रे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची १०, हवेलीमध्ये ६ आणि जिल्हास्तरावर १२ अशी एकूण ४३ तक्रार निवारण केंद्रे स्थापन केली आहेत. त्याद्वारे प्रवेशादरम्यान पालकांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण केले जाईल. तसेच, शाळानिहाय प्रवेशयाद्या संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील, अशी माहितीही शेख यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी आज निघणार लॉटरी
By admin | Updated: April 30, 2016 01:35 IST