LMOTY 2025: महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी...
अनुराधा भोसले (अवनी संस्था -हनबरवाडी - कोल्हापूर)
- मुंबईत 'निर्मला निकेतन'मध्ये समाजकार्याची पदवी मिळवली. विविध ठिकाणी नोकरी केली.- ठाण्याच्या 'श्रमजीवी संस्थे'पासून प्रेरणा घेत बालकांसाठी अवनी संस्था सुरू केली. ५० मुलींना शिक्षण आणि जीवनकौशल्ये अभ्यासक्रम शिकवितात.- 'अवनी'ने कोल्हापूर जिल्ह्यात वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली.- ८६ हजार मुलांसाठी शिक्षणाची पायवाट तयार केली. एकल स्त्रियांना 'एकटी' संस्थेच्या माध्यमातून आत्मसन्मान मिळवून दिला.- महिलांच्या हक्कासाठी केलेल्या चळवळीमुळे विधवा, परित्यक्ता अशा ४ हजार महिलांना निवृत्तिवेतन सुरू झाले.- 'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ बच्चन यांनी 'अवनी'चे कार्य सर्वदूर पोहोचवले आहे.
डॉ. अभिजीत सोनवणे (सोहम ट्रस्ट - पुणे)
- पुण्यात 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर' अशी ओळख.- भीक मागणाऱ्या आजी, आजोबा आणि त्यांच्या मुला-मुलींचे पुनर्वसन करण्याचा ध्यास घेऊन गेल्या आठ वर्षापासून भिकाऱ्यांपर्यंत मोफत औषधोपचार पोहोचवित आहेत.- रस्त्यावर भीक मागणाऱ्या २९० लोकांना छोटे व्यवसायासाठी मदत देऊन स्वयंपूर्ण केले. आज ते सन्मानाने "गावकरी" म्हणून जगताहेत.- प्रतिकूल परिस्थितीत भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती. त्याची उतराई म्हणून ५ लाख उत्पन्नाची नोकरी सोडून २०१५ पासून हे काम सुरू केले आहे.- एकाच वेळी शंभर वृद्ध भिक्षेकरी एखाद्या भागाची स्वच्छता करतात हा जगातला पहिला प्रकल्प आहे. स्वच्छता टीममधील शंभर वृद्ध भिक्षेकरी पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाचे पुणे जिल्ह्याचे बँड अँबेसिडर आहेत.
संतोष गर्जे - प्रीती गर्जे (बालग्राम - गेवराई - जि. बीड)
- ६ ते १८ वयोगटातील अनाथ बालकांसाठी (सहारा) बालग्राम परिवार, छत्रपती संभाजीनगर येथील शरणापूर येथे १८ वर्षापुढील निराधार युवतींसाठी युवाग्राम प्रकल्प चालवला जातो.- सध्या संस्थेतील ११७ मुले, मुली वेगवेगळ्या शाखेत अंगणवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत.- संस्थेत मोठी झालेली १२ मुले खासगी आणि शासकीय सेवेत तर १६ मुले युवाग्रामच्या माध्यमातून कला, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेत उच्च शिक्षण घेत आहेत.
सूर्यकांत कुलकर्णी (सामाजिक आर्थिक विकास संस्था -परभणी)
- राज्यातील १०० संस्थांना सोबत घेत युनिसेफ, सेव्ह दी चिल्ड्रेन, क्रायच्या सहभागाने २००२ साली बाल हक्क अभियान फोरमची स्थापना केली. २००५ साली मुलांसोबत काम करणाऱ्या ५५ संस्थांना सोबत घेऊन बाल हक्क संरक्षण समिती राज्यस्तरीय फोरमची स्थापना केली.- पुण्याच्या यशदामध्ये सल्लागार म्हणून काम करताना बाल हक्क विभाग सुरू केला. DFID या संस्थेच्या प्रकल्पाद्वारे २०,००० पेक्षा अधिक बाल कामगारांची सुटका केली.- पहिल्या बाल हक्क संरक्षण आयोगावर ३ वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. गेल्या ४० वर्षापासून महिला विकासासाठी १५०० बचत गट स्थापन करून अंदाजे १७००० महिलांचे संगठन. ३००० महिला शेतकऱ्यांसाठी शेती आधारित उद्योगाविषयी प्रशिक्षण मदत करत आहेत.
यजुर्वेद्र महाजन (दीपस्तंभफाउंडेशन - जळगाव)
- सोळा वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारा प्रकल्प जळगाव, पुणे येथे सुरू केला.- भारतातील १८ राज्यांतील ५०० विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात.- २००६ पासून राज्यातील हजारो आदिवासी, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले.- त्यातील १२०० हून अधिक विद्यार्थी प्रशासनात विविध पदांवर कार्यरत आहेत.- देशातील पहिल्या इन्क्लुझिव्ह व अॅक्सेसिबल प्रकल्पाची जळगाव येथे लोकसहभागातून निर्मिती केली.
ज्यांची नामांकने झाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/