मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यातच आता फोडा-फोडीचे आणि बंडखोरी राजकरण पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार उमेदवारी दिली नसल्यामुळे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. नाराज असलेल्या सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार बुधवारी, एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले होते. अब्दुल सत्तार यांनी याआधी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर सत्तार यांनी खुलासा केला होता की, मी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याने मदतीसाठी सर्वच नेत्यांची भेट घेत आहोत.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी सत्तार इच्छुक होते. परंतु, पक्षाने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच लोकसभा निवडणूक लढवायची की, नाही यासाठी सत्तार यांनी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर कार्यकर्ता मेळावा देखील घेतला होता. परंतु, या मेळाव्यात काहीही निर्णय झाला नव्हता.बुधवारी मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सत्तार हे एकाच विमामाने मुंबईकडे रवाना झाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन सिल्लोड विधानसभा भाजपकडून लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.