मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त प्रवाशास स्थानकाबाहेर उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेपर्यंत जाण्यासाठी तत्काळ ‘स्ट्रेचर’ उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून एक नवी क्लृप्ती लढवण्यात आली आहे. लोकलच्या डब्यात असणा-या आसनांऐवजी त्यावर स्ट्रेचर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. एका डब्यात फक्त दोन आसनांवर अशा प्रकारचे स्ट्रेचर बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सागितले. रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. अशावेळी अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने तशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही गर्दीच्या स्थानकांबाहेर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता मध्य रेल्वेकडून आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त प्रवाशास रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळाच उपाय करण्यात आला आहे. लोकलच्या डब्यातच आसनासारखेच दिसणारे स्ट्रेचर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलमधील पुरुष प्रवाशांच्या दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात हे स्ट्रेचर बसवण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. सुरुवातीला चार ट्रेनमधील प्रत्येक एका डब्यात दोन स्ट्रेचर बसविले जातील. प्रायोगिक तत्त्वावर हे स्ट्रेचर बसविल्यानंतर हळूहळू अन्य लोकलच्या डब्यांतही ते बसवण्यात येतील, असेही निगम यांनी सांगितले. आसनांसारख्याच दिसणाऱ्या या स्ट्रेचरवर प्रवासी बसून प्रवासही करू शकतील. एखादा मोठा प्रसंग किंवा घटना घडल्यास त्या वेळीच हे स्ट्रेचर प्रवासी काढू शकतात आणि त्याचा वापर अपघातग्रस्त प्रवाशासाठी करू शकतात, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लोकल प्रवास ‘स्ट्रेचर’वरून
By admin | Updated: October 11, 2014 06:18 IST