मुंबई : प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आल्यानंतर आता यामध्येच बदल करून रेल्वेकडून पेपरलेस तिकीट सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोबाइल तिकीट सेवेत प्रिंट तिकीट ग्राह्य धरले जाते. मात्र यात बदल करतानाच मोबाइलमधील तिकीटच ग्राह्य धरण्यात येणार असून चेन्नईत त्यावर चाचणीही सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आता येत्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवर सुरू केली जाणार असल्याचे रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) अजय शुक्ला यांनी सांगितले. तिकिटांतील गैरप्रकार थांबविण्यासाठी मोबाइल तिकीट सेवा जीपीएस यंत्रणेशीही जोडण्यात येईल. यात प्रवाशांना स्टेशन परिसरात येण्यापूर्वीच तिकीट काढावे लागणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. गुगल प्ले आणि विंडोज स्टोअरमधून मोबाइल तिकीट सेवा डाऊनलोड करण्याची सोय आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते. त्यानंतर अनेक प्रक्रिया पार पडल्यानंतर स्थानकावर जाऊन युनिक बुकिंग आयडीद्वारे एटीव्हीएमवर तिकिटांची प्रिंट मिळते. मात्र यासाठी सगळी प्रक्रिया पार पाडतानाच पुन्हा एटीव्हीएमवर जाऊनच तिकीट घ्यावे लागत असल्याने त्याचा फारसा फायदा प्रवाशांना मिळत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) अजय शुक्ला यांनी सांगितले की, चेन्नईत मोबाइल तिकिटामध्ये विनाप्रिंट सेवा सुरू करण्याची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी होत असून, येत्या दोन महिन्यांत मुंबईतील लोकल प्रवाशांसाठीही पेपरलेस तिकीट सेवा सुरू करण्यात येणार आहे. विनाप्रिंट सेवेसाठी एक विशिष्ट मोबाइल अॅप तयार करण्यावरही काम केले जात असून जे जीपीएस यंत्रणेशी जोडलेले असेल, असे शुक्ला यांनी सांगितले. यात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाइलवर आलेल्या तिकिटांची माहिती किंवा त्याची पीडीएफ दुसऱ्याला ट्रान्सफरही करू शकणार नाही. यामध्ये जीपीएस यंत्रणेशी जोडण्यात येणार असल्याने अॅपमध्ये उपयोग केले जाणारे सॉफ्टवेअर स्टेशन परिसरातून बाहेर आल्यानंतर फाइलला करप्ट करेल. यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्यांदा करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
दोन महिन्यांत लोकलचे पेपरलेस तिकीट
By admin | Updated: May 5, 2015 01:50 IST