लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य निवडणुका चार महिन्यांत घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मे २०२५ मध्ये निकाल दिला असला तरी साधनांच्या कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी जादा कालावधी लागणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याचे मंगळवारी निवडणूक आयोगाने सांगितले.
टप्प्याटप्प्याने घेणार निवडणुका
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आधी जि. प. निवडणुकांनंतर मनपांच्या नियोजनाची शक्यता आयोगाने वर्तविली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्यांनी घ्याव्या लागतील.
२०११ च्या लोकसंख्येनुसारच आरक्षण : २०११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी लोकसंख्या उपलब्ध असून त्यानुसार आरक्षण ठरविले जाईल. मनुष्यबळ, मतदार याद्यांसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. प्रभाग, वॉर्ड, गटरचना प्रक्रिया सुरू आहे.