लोकल दहीहंडी ग्लोबल होईल

By admin | Published: August 30, 2015 12:22 AM2015-08-30T00:22:45+5:302015-08-30T00:22:45+5:30

गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी हा उत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण. आजवर आपण गोकुळाष्टमीला फुटणारी दहीहंडी पाहात आलो आहोत.

Local Dahi Handi Global | लोकल दहीहंडी ग्लोबल होईल

लोकल दहीहंडी ग्लोबल होईल

Next

 विनोद तावडे ( क्रीडा मंत्री)

गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी हा उत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण. आजवर आपण गोकुळाष्टमीला फुटणारी दहीहंडी पाहात आलो आहोत. अगदी लाखो लोक दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. आजवर लोकल असलेला मानवी मनोरे रचण्याचा हा थरारक खेळ ग्लोबल करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य सरकारने या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे.

महाराष्ट्राची सीमा ओलांडून तो आता देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा हा मार्ग आहे. हा दर्जा देताना हा खेळ कसा अधिकाधिक सुरक्षित राहील याचीही दक्षता घेतली जात आहे. दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणारे मानवी मनोरे हे चित्तथरारक असतात. आजवर आपण केवळ उत्सव या दृष्टिकोनातूनच याकडे पाहात आलो आहोत. या मानवी मनोऱ्यांच्या माध्यमातून कळत-नकळत संघभावना, साहस, जिद्द, चिकाटी या भावना आणि शारीरिक क्षमता वाढीस लागते. हा क्रीडा प्रकार असून, तो एक दिवसाच्या उत्सवापुरता मर्यादित न राहता १२ महिने कधीही खेळता येईल, या दृष्टीने साहसी खेळाचा दर्जा देऊन त्याचा समावेश साहसी क्रीडा प्रकारांत करण्याबाबत सरकारकडे वेळावेळी विविध स्तरांवरून मागणी करण्यात येत होती.
त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सरकारला शिफारशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता येण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोविंदा या मानवी मनोरे उभारण्याच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मान्यता देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर गोविंदाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देताना या खेळासाठी आवश्यक नियमावली आखण्यात येईल. यासाठी या क्रीडा प्रकाराला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच यासाठी सुरक्षा साधनांचा योग्य वापर करण्यासंदर्भात, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहीहंडीचा सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
मुळात राज्याच्या व्यापक क्रीडा धोरणांतर्गत राज्यात साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देण्याच्या मुद्द्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स सेंटरची स्थापना करणे, साहसी खेळांच्या क्रीडा सुविधांची निर्मिती करणे, साहसी खेळांच्या स्पर्धा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन, साहसी क्रीडा पुरस्कार देणे, साहसी खेळांच्या राज्य संघटना, संस्था व खेळाडूंना आर्थिक साहाय्य देणे आदी विविध बाबींचा अंतर्भाव आहे. साहसी क्रीडा प्रकारांतील ट्रेकिंग, माउंटनिअरिंग, स्किइग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हॅण्डग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यात साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Web Title: Local Dahi Handi Global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.