कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) टेम्पोमधून गोव्याहून चक्क दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज, गुरुवारी सकाळी दोघांना पकडले. त्यांच्याकडे विदेशी बनावटीच्या ८३ बाटल्या व ‘गोकुळ दूध’ असे लिहिलेले प्लास्टिकचे ३०० क्रेट जप्त करण्यात आले. दारू वाहतूक करून संघाची बदनामी केल्याबद्दल या टेम्पोचा दूध वाहतुकीचा ठेका संघाने आजच रद्द केला. संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनीच तशा सूचना दिल्या. हा टेम्पो संदीप बाळासाहेब डोंगळे, रा. घोटवडे यांचा असल्याची कबुली चालकाने दिली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे सहायक निरीक्षक दत्ता कोळी यांनी दिली. संघाचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा संदीप हा पुतण्या आहे. त्यामुळे या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले.याप्रकरणी टेम्पोचालक संदीप हिंदूराव पाटील (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) व अमित बाजीराव पाटील (रा. भेंडवडे, ता. भुदरगड) यांना जागीच अटक करण्यात आली. टेम्पो (एमएच ०९ सीए ४६६४)सह ९ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संघाचे पिशव्यांतील दूध रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोव्यातही पाठविले जाते. आतापर्यंत हे दूध टँकरमधून पाठविले जात होते व गोव्यातच त्याचे पॅकिंग केले जात होते; परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी पॅकिंग युनिट बंद केल्याने आता कोल्हापुरातूनच क्रेटमधून पिशव्या पाठविण्यात येतात. या क्रेटमधून गोव्यातून येताना दारूची वाहतूक होत असल्याची माहिती या विभागास आठ दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज पहाटे पाच वाजल्यापासून सापळा रचला होता. राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ संशयित वाहनांची तपासणी करताना या टेम्पोमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. त्या जप्त करून चालक व क्लीनरला अटक करण्यात आली. चालकाने ही दारू आपण गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना देणार होतो, अशी कबुली दिली आहे. चालक टेम्पोमालकाबाबत चुकीची माहिती देऊ शकतो म्हणून उद्या, शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तो कुणाच्या नावे नोंद आहे, याची चौकशी केली जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय गांधीनगरच्या व्यापाऱ्याचीही चौकशी केली जाणार आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. के. जाधव, साहाय्यक निरीक्षक दत्ता कोळी, डी. एस. चव्हाण, जवान शंकर मोरे, पंकज खानविलकर, कृष्णात पाटील, बी. एम. म्हाबर, आदींनी भाग घेतला.‘गोकुळ’ची नाहक बदनामीचार पैसे मिळतात म्हणून दारूची वाहतूक करण्याचा उद्योग चालकाकडूनच झाला आहे. त्यात संघाचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. टेम्पोचे मालकही असला घाणेरडा प्रकार कधीच करणार नाहीत; परंतु तरीही त्यांच्या टेम्पोमध्ये दारू सापडल्याने व्यक्तिगत त्यांची व संघाचीही नाहक बदनामी झाली. तोंड फुटलेच..या प्रकरणात संघाची बदनामी नको म्हणून हे प्रकरण मिटविण्यासाठी बरेच प्रयत्न झाले; परंतु अखेर त्याला तोंड फुटलेच. सायंकाळनंतर वृत्तवाहिन्यांवर संघाच्या टँकरमध्ये दारूचे बॉक्स सापडल्याची बातमी दिली गेल्याने जिल्हाभर त्याची जोरदार चर्चा झाली.अशा टेम्पोमालकाशी ‘गोकुळ’चा दूध पोहोचविण्याचाच एकावेळेचा ठेका असतो. तो संघाच्या मालकीचा टेम्पो नव्हे. त्यामुळे त्याने परत येताना काय करावे याच्याशी संघाचा संबंध येत नाही. तरीही आम्ही चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू.- दिलीप पाटील, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ
दुधाच्या टेम्पोमधून दारूची वाहतूक
By admin | Updated: November 28, 2014 00:32 IST