मुंबई : कोणत्याही प्रांतातून आलेली व्यक्ती ही गेली १५ वर्षे मुंबईत राहत असेल आणि तिला कामचलाऊ मराठी बोलता येत असेल तर तिला रिक्षा परवाने देणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राजकारणात आपली जागा चाचपडत असलेले लोक उगाच वाद निर्माण करतात, असा टोला त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे परवाने देण्याच्या जनभावनेचा आदरच परिवहनमंत्री दिवाकर रावते करीत आहेत. ज्यांना हे परवाने मिळतील त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असेल आणि तशी कार्यवाहीही केली जाईल. राजकारणात आपल्यासाठी जागा शोधणारे लोक काही विधाने करतात. मीडिया त्यांना दहापट प्रसिद्धी देतो पण आम्हाला त्यांना (राज ठाकरे) जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच आम्ही देऊ. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)
‘कोणत्याही प्रांताच्या व्यक्तींना परवाने देणार’
By admin | Updated: March 12, 2016 04:20 IST