महाराष्ट्राचा जयजयकार ‘अखंड’ राहू दे!

By admin | Published: May 1, 2016 03:34 AM2016-05-01T03:34:23+5:302016-05-01T03:34:23+5:30

आज महाराष्ट्र दिन. कधी नव्हे एवढी महाराष्ट्र तोडण्याची आणि अखंड ठेवण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर चढत आहे; विदर्भासाठी प्रसंगी रक्त सांडू

Let the glory of Maharashtra remain 'unbroken'! | महाराष्ट्राचा जयजयकार ‘अखंड’ राहू दे!

महाराष्ट्राचा जयजयकार ‘अखंड’ राहू दे!

Next

मुंबई : आज महाराष्ट्र दिन. कधी नव्हे एवढी महाराष्ट्र तोडण्याची आणि अखंड ठेवण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर चढत आहे; विदर्भासाठी प्रसंगी रक्त सांडू, असेही छातीठोकपणे सांगितले जाते. राजकीय पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत. पण सामान्यांना आणि खासकरून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना अखंड महाराष्ट्राबद्दल किंवा विदर्भ, कोकण आणि मराठवाडा वेगळा करण्याच्या भूमिकेबाबत काय वाटते, ते ‘टीम लोकमत’ने जाणून घेतले.

विकासावर लक्ष केंद्रित करा
जेव्हा छोटी राज्ये स्थापन करण्याच्या मागणीमागे त्या राज्यांचा विकास करणे, रोजगारनिर्मिती करणे हा उद्देश असतो. मात्र आतापर्यंत स्थापन झालेल्या छोट्या राज्यांचा विचार केला तर तशी प्रगती झाल्याचे आपणाला कुठे दिसत नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ, मराठवाडा किंवा कोकणाची मागणी करताना याचाही विचार झाला पाहिजे. मुळात अशी स्वतंत्र मागणी करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने विकासावर लक्ष केंद्रित केले तर कोणत्याही स्वतंत्र राज्याची मागणी होणार नाही. त्यामुळे असे उठाव करण्याऐवजी राज्याच्या विकासावर भर देणे हाच उत्तम मार्ग आहे.
- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते

विकासाचे मॉडेल राबवा
स्वतंत्र मराठवाडा, स्वतंत्र कोकण आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. पण ही मागणी का होते आहे? याचा कोणी विचार करत नाही. उठावामागचे कारण कोणी शोधत नाही. विदर्भ किंवा तत्सम ठिकाणी मूलभूत सेवा-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तिथला विकास झाला नाही. भूभागाचा विकास झाला म्हणजे विकास झाला, असे म्हणता येत नाही. तिथल्या लोकांच्या समस्या सुटल्या आहेत का? याचा विचार कोणी करत नाही. मुळात आपल्याकडे विकासाचे नियोजन नाही. म्हणून समस्या निर्माण होत आहेत. यावर उत्तर म्हणून विकासाचे मॉडेल राबवले पाहिजे.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या

विभाजनाची लाट केवळ ‘राजकीय’
आतापर्यंत साहित्यातील अनेक महाराष्ट्र गीते विदर्भातील कवींनी लिहिली. त्यात विठ्ठल वाघ, राजा बढे, सुरेश भट अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र आता त्यांच्या महाराष्ट्राविषयी असलेल्या अस्मितेला तडा देण्याचा कट सुरू आहे विभाजनाने प्रश्न सुटणार नाहीत, हे राज्यकर्त्यांना कळत नाही. वेगळ्या विदर्भ-कोकणाच्या मागणीमागे केवळ राजकीय असूया आहे. विकास होत नाही, हा प्रशासनाचा दोष आहे. अशा मागणीने विभाजनाची लाट येईल, हे चुकीचे आहे. या सगळ्यात मराठी माणसांच्या भावनांचा कोणीच विचार करत नाही, हे दुदैव आहे.
- अरुण म्हात्रे, कवी

एकसंध राहण्यातच सर्वांचे हित
महाराष्ट्राचे तुकडे करून वेगळी राज्ये बनविण्यास आमचा विरोध आहे. छोटी राज्ये केल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढेल. मुंबईमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तसेच दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रातील उत्पन्न इतर मागासलेल्या भागात वापरता येते. त्यामुळे महाराष्ट्र एकसंध राहण्यातच सर्वांचे हित आहे. शिवाय अनेक महामंडळे व संस्था यांचे राज्यातल्या विविध भागांत जाळे विणले आहे. ती बंद पडल्यास रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. मराठी भाषिकांची अनेक राज्ये होणे हे भाषावार राज्ये असली पाहिजेत या संकल्पनेलासुद्धा तडा देणारे आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

राज्याचे तुकडे करण्याचा विचार आततायीपणाचा
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून विदर्भ मराठवाड्यावर अन्याय झाला, अशी जर तेथील नागरिकांची भावना असेल तर ती समजूत काढून दूर करता येईल.मात्र आता मराठवाडा आणि विदर्भाचा पंचवार्षिक योजना आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून अनुशेष भरून काढता येऊ शकतो. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. हा आततायीपणा ठरेल. - अ‍ॅड. गणेश सोवनी

महाराष्ट्राचे तुकडे
होता कामा नयेत
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण खूप मोठा लढा दिला आहे. आणि आता जर स्वतंत्र विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाची मागणी होत असेल तर ते योग्य नाही. प्रत्येकाने जर अशी मागणी केली तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल. याऐवजी आपण एकत्र राहत राज्याच्या विकासावर भर दिला तर ते अधिकच उत्तम राहील.
- सुगंधी फ्रान्सिस,
सामाजिक कार्यकर्त्या

मराठी माणसाचा विचार करावा!
राज्यातून विदर्भ, मराठवाडा, कोकण वेगळा करावा, अशी मागणी जोर धरते आहे. या मागणीचा सारासार विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी माणसासाठी काय चांगले आहे? याला प्राधान्य दिले पाहिजे. या निर्णयानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार केला पाहिजे. तिथे रोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तोडगा काढला पाहिजे.
- डॉ. जलील परकार, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ

आर्थिक परिस्थितीचा विचार महत्त्वाचा!
राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. एकत्रितरीत्या हे प्रश्न सोडवणे शक्य आहे. पण, राज्य दोन-तीन भागांत विभागले गेल्यास या प्रश्नांवर मात करणे कठीण होईल. सध्या राज्यभरात पाण्याची कमतरता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. कोकणातही शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. एकूणच राज्यात असलेल्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

वेगळे होण्यापेक्षा विकासावर भर द्या
विदर्भ आणि कोकणच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा राजकारणी नेतृत्वामुळे अधिक चांगला झाला आहे. मात्र त्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा आणि कोकण याची स्थिती वेगळी आहे. विदर्भात दळणवळणाची समस्या आहे. त्याचबरोबर वर्धा, भंडारा येथील नक्षलवादी कारवायांमुळे येथील विकास खुंटला आहे. वेगळे होण्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे.
- फिरोज फारुक शेख, सचिव, वंदे मातरम् शिक्षण संस्था

महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे
एक राज्य, एक भाषा अशा सूत्राने जर राज्याची विभागणी झालेली आहे, तर वेगळा विदर्भ आणि मराठवाडा असण्याची गरजच नाही. स्वतंत्र झाल्याने या समस्या दूर होतील का? स्वतंत्र होण्यापेक्षा समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे. येथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी सगळ्यांनीच एकत्र येणे गरजेचे आहे; आणि त्यासाठी महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे.
- प्रा. दीपा ठाणेकर, झुनझुनवाला महाविद्यालय

महाराष्ट्र एकसंध करण्याकडे लक्ष द्यावे
‘तहान लागल्यावर विहीर खणायची’ हे जेवढे मूर्खपणाचे लक्षण आहे. यात प्रकर्षाने वेगळ्या विदर्भाचा हा मुद्दा उगाचच डोके वर काढत आहे. ज्या बौद्धिक आणि शारीरिक शक्तींचा वापर केला जात आहे त्याच विचारांच्या जोरावर महाराष्ट्र एकसंध कसा राहील व जगाच्या नकाशावर छाप कशी उमटवेल याकडे लक्ष केंद्रित करण्याची आज आवश्यकता आहे. ‘महाराष्ट्र दिना’पुरता महाराष्ट्र एक राहण्यासाठीच्या गप्पा न मारता महाराष्ट्र कायम एकच राहिला पाहिजे.
- प्रा. प्रवीण वीर, प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन

राज्याची ताकद एकीमध्ये
संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी प्राण पणास लावले़ त्या महाराष्ट्राच्या विभाजनाची खरेतर गरज नाही़ या राज्याची ताकद त्याच्या एकीमध्ये आहे़ विभाजनातून वाद मिटणार आहेत का? उलट नव्याने सीमाप्रश्न निर्माण होतील़ त्यामुळे महाराष्ट्र संयुक्त राहणेच योग्य आहे़
- रमेश प्रभू, अध्यक्ष, अ‍ॅफोर्डेबल हाउसिंग वेल्फेअर आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया

विकासासाठी एकसंध महाराष्ट्राची गरज
कोणत्याही गोष्टीचा विकास करण्यासाठी ती गोष्ट एकसंध असणे गरजेचे असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक महाराष्ट्र असणे गरजेचे आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात समस्या आहेत, हे जरी खरे असले तरी त्यांना महाराष्ट्रातून वेगळे करून या समस्यांचे निराकारण होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होता कामा नयेत. समस्यांवर नेते मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून उपाययोजना केल्यास वेगळा विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हा मुद्दाच गौण ठरेल. - निशा ठक्कर, महिला अंध योग प्रशिक्षक

महाराष्ट्राचे तुकडे करून काहीच मिळणार नाही
स्वतंत्र विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याची मागणी करणे योग्य नाही. महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे. आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे. सध्या अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि ते गंभीर आहेत. ते प्रश्न तातडीने सोडविले पाहिजेत. सध्या दुष्काळासह भ्रष्टाचारासारख्या समस्यांनी महाराष्ट्र होरपळत आहे. यातून आपण मार्ग काढला पाहिजे. असे केले तरच आपला विकास होईल. महाराष्ट्राचे तुकडे करून काहीच मिळणार नाही.
- शिवाजीराव चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

सर्वसामान्यांच्या हिताकडे
लक्ष द्या
वेगळे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची गरज आहे. ज्यात सर्व राजकीय पक्षांना स्थान असले पाहिजे. या प्रकरणांमध्ये पक्षीय राजकारण करून चालणार नाही. एकंदर राज्याचा विकास किती झाला हे पाहणेही महत्त्वाचे आहे. विकास झाला नाही म्हणून अशी मागणी होते आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे. एखादे राज्य स्वतंत्र करायचे म्हटले तरी नंतर त्या राज्याचा सर्वांगीण विकास होईल की नाही? याचाही सारासार विचार केला पाहिजे.
- डॉ. बी. आर. कुमार अग्रवाल, संचालक, सेफगार्ड ग्रुप आॅफ कंपनीज

Web Title: Let the glory of Maharashtra remain 'unbroken'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.