ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि.२१ - सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लेडिज डब्यात घुसून महिलेवर हल्ला करणा-या गर्दुल्याला महिलांनी चांगलाच हिसका दाखवत त्याला पकडून दिले आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात हा प्रकार घडला असून त्या महिलांनी त्या गर्दुल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सीएसटीच्या दिशेने जाणा-या लोकलच्या महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात डोंबिवली स्थानकात एक तरूण चढला. सकाळच्या वेळेसही डब्यात प्रचंड गर्दी असल्याने अनेक महिलांना त्याचे धक्के लागत होते. त्यामुळे एका महिलेने त्या तरूणाला महिलांच्या डब्यात का चढलास असा जाब विचारत एका कोप-यात उभे राहण्यास बजावले. मात्र त्याने उलट उत्तर देत त्या महिलेलाच धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. हे पाहून त्या महिलेने इतरांच्या साथीने त्या तरूणाला पकडून ठेवत चांगलाच हिसका दाखवला. त्यानंतर तिने रेल्वे हेल्पलाइन नंबरवर फोन करत मदत मागितली असता पोलिसांनी तिला त्या तरूणाला घेऊन कुर्ला स्थानकात उतरा, तिथे आमचे कर्मचारी असतील असे सांगितले. त्याप्रमाणे त्या महिलेने कुर्ला स्थानक येईपर्यंत त्याला बांधून ठेवले व त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. कुर्ला पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.