शिर्डी : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत व याच मुद्यावर पुन्हा निवडणूक लढवावी, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहील, असे आव्हान राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विदर्भवाद्यांना दिले़साईदर्शनासाठी आलेल्या विखे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला़ वेगळा विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या भावनेचा अनादर असल्याचे मत व्यक्त करतानाच विदर्भाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विखे यांनी केला़ विधीमंडळात राज्य सरकारमधील मंत्र्यांविरूध्द भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले़ सरकारची जनमानसातील प्रतिमा मलिन होवू लागल्याने लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच सरकारने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा समोर आणला असल्याचा आरोपही विखे यांनी केला़नागपूरला अनेक मोठे प्रकल्प येत आहेत, तेथे विकासाचा अनुशेष आहे, हे खरे आहे़ मात्र अनेक योजनांचा निधी राज्यपालांचे निकष डावलून तिकडे वळवला जात आहे़ तोही राज्याचाच भाग आहे़ त्यामुळे त्यात गैर काही नसले तरी मुख्यमंत्र्यांनी समतोल विकास करण्याबाबतही विचार करावा, अशी आपली भावना असल्याचे विखे यांनी सांगितले़साईसंस्थान विश्वस्त मंडळावरून वाद निर्माण झाला असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले, मागील सरकारच्या काळात नियमावली तयार करण्यात आली आहे़ त्यानुसार सरकारने विश्वस्त नियुक्त केले असावेत, कुणाला विश्वस्त नेमायचे हा सरकारचा अधिकार आहे़ साईबाबांची महती खूप मोठी आहे़ येथे नियुक्तीवरून किंवा पदावरून वाद होणे हे योग्य नाही़ (प्रतिनिधी)
विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 04:22 IST