अंतिम विदाई

By admin | Published: July 2, 2017 01:30 AM2017-07-02T01:30:44+5:302017-07-02T01:30:44+5:30

विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी

Last farewell | अंतिम विदाई

अंतिम विदाई

Next

- डॉ. नीरज देव  
विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर मोठे लाकडाचे खोड ठेवले व त्याचा चेहरा दिसेनासा झाला. त्या लाकडांमध्ये आता काष्ठवत् झालेला त्याचा देह; देहरूपी काष्ठ काष्ठातच दाबले गेले, चिता पेटविली गेली. तो दाह बसताच, मी झटकन मागे सरकलो. विचारांचे आवर्तन सुरू झाले. आज मी चटकन बाजूला सरकलो, तरी पुढे केव्हातरी मीही अशीच आगीची शाल लपेटून झोपणार.. तेवढ्यात शब्द कानावर आदळले अंतिम विदाई. अखेरचा निरोप! अंतिम विदाई? अरे, येथे तर फक्त मृतदेह आहे. काष्ठवत लाकडासारखा त्याला लाकडात रचणे ही का असते अंतिम विदाई? देह मोठा की आत्मा-देहातील चैतन्य? जर उत्तर चैतन्य असेल, तर ते जेव्हा जाते, त्याच वेळी खरी अंतिम विदाई झालेली असते. त्या वेळी कोण जवळ असेल-नसेल सांगता येत नाही. हे तर केवळ उपचार झाले देहाला मिटवायचे. मृत्यूचा न्याय सारखा असतो. आपले उपचार असतात वेगळे. मग अंतिम विदाई याला कसे म्हणायचे? कदाचित, असे असावे त्या विदाईला आपण नसतो, म्हणून ही विदाई आपल्याला फार महत्त्वाची वाटत असावी.
खरे सांगायचे, तर आपण जोडले जातो फक्त देहाशी. देहच ओळख, सर्वस्व असतो आपल्यासाठी. जोवर देह समोर असतो, तोवर बंध निर्माण होतात. देहाचा नाश झाला की, आपल्याला वाटते झाला शेवट, संपले सारे काही. तसे ते खोटेही नसते. बघा नं युद्धाचा शेवट शत्रूच्या देहनाशातच होतो. नष्ट झालेला शत्रूचा देह विजयाची ज्योत जागवितो. एखाद्या गुन्हेगाराला दिलेली सर्वोच्च शिक्षा देहनाशाचीच असते. देहनाशाने प्रश्न सुटतो का, हा प्रश्न अलाहिदा, पण तो शत्रू संपतो एवढे मात्र नक्की. जी गोष्ट शत्रू संबंधात असते, तीच मित्राबाबत, प्रियजनाबाबत असते. त्यांचा संपलेला देह यातना, वेदना देतो व विव्हल करतो. त्यांचा आत्मा अमर आहे, हे समाधान करून घेतानासुद्धा देहनाशाचे दु:ख जिवाला जाळत राहते. जर आत्मा अमर आहे, असे आपण मानत असू, तर हा शोक व्यर्थचा नाही का?मला वाटते, त्याचे कारण हे असावे की, आपल्या त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावभावना, संबंध, नाते, हेवेदावे सारे काही त्याच्या देहासोबत जळून जात असावेत व राहत असाव्यात फक्त एकांगी आठवणी - त्यात नवीन भर न पडणाऱ्या आठवणी. त्यामुळेच ती अंतिम विदाई असावी, त्याच्या देहाची आणि त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आपल्या स्मृतीची. अचानक माझ्या ध्यानात आले.. त्याच्या त्या देहासोबत माझ्याही व्यक्तित्त्वाचा एक हिस्सा जळत होता. अगदी माझ्याही नकळत, जो जोडला गेला होता त्याच्याशी. परंतु जिथे आपला काहीही संबंध नसतो, अशा एखाद्या तिऱ्हाईताचा चितेवर जळणारा देह पाहून, आपण का जळत असतो? मला वाटते, जळण्याची ती क्रिया कोठेतरी ही जाणीव देत असते, आपण ज्वलनशील आहोत, नश्वर आहोत याची. कळत-नकळत आपण पाहत असतो आपल्यालाच त्या चितेवर; आपुले जळणे पाहिले म्यां डोळा.

Web Title: Last farewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.