वालचंदनगर : बारामती-इंदापूर मुख्य रस्त्यावर प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून बसस्थानके उभारण्यात आली, मात्र परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे बसस्थानके अखेरच्या घटका मोजत आहेत. प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या परिवहन खात्याची बसस्थानके मात्र प्रवाशांच्या गैरसोयीची ठरत आहेत. इंदापूर मार्गावरील काही बसस्थानकांत हॉटेल उघडल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात ताटकळत उभा राहण्याची वेळ आलेली आहे. प्रवाशांना या बसस्थानकाचा कोणताच फायदा होत नसल्यामुळे असून ही खोळंबाच म्हणण्याची वेळ आलेली आहे. उन्हाळ्यात, पावसात संरक्षणासाठी पिक-अप शेड उभारण्यात आलेले आहे. या पिक-अप शेडमध्ये अनेक व्यावसायिकांनी आपला धंदाच उभारला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही पिक-अप शेड वापरण्यास योग्य नसल्याने व धोकादायक झालेले असल्याने प्रवासी भीतीपोटी ताटकळत बाहेर उभा राहत आहेत. परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी या पिक-अप शेडमधील उद्योग त्वरित बंद करून प्रवाशांना मोकळे करून देण्यात यावीत. सणसर, लासुर्णे, बेलवाडी, जंक्शन, अंथुर्णे, शेळगाव, गोतंडी या बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिक-अप शेडमध्ये अतिक्रमण, तर काही मोडकळीस आलेली आहेत. (वार्ताहर)>शालेय विद्यार्थ्यांना या पिक-अप शेडमध्ये आसरा घेण्यासाठी धंदेवाल्यांना गयावया करावी लागत आहे. या शेडवर अनेक नेत्यांचे फ्लेक्स बोर्ड लावून झाकून टाकले जात असल्याने शेड दिसणे अवघड झालेली आहेत. अशा फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर कर आकारण्यात यावेत. परिवहन खात्याच्या परवानगीशिवाय बोर्ड लावण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गावोगावची बसस्थानके मोजताहेत अखेरची घटका
By admin | Updated: July 4, 2016 01:42 IST