ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण मागवले आहे. ललित मोदींची घेणे आता राकेश मारियांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.
शनिवारी राकेश मारिया यांनी ललित मोदींची भेट घेतल्याचे छायाचित्र झळकले होते. अखेरीस या प्रकरणावर राकेश मारिया यांनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. जुलै २०१४ मध्ये लंडन येथे एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. यादरम्यान मोदींची भेट झाल्याचे मारियांनी म्हटले होते. ललित मोदींच्या कुटुंबाला धोका असल्याने यासंदर्भात ही भेट झाली होती असे मारिया यांनी म्हटले होते. याभेटीची तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील व खंडणी विरोधी पथकाला माहिती दिली होती असेही मारिया यांनी नमूद केले होते. मात्र पोलिस आयुक्तांनी १६ गुन्ह्यांमध्ये चौकशी सुरु असलेल्या आरोपीची भेट घेणे योग्य होते का असा सवाल उपस्थित होत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मारियांची बाजू ऐकून घेतल्यावरच कारवाईसंदर्भातील पुढील निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील कारागृहांमधील ज्या कैद्यांची बँक खाती नसतील त्यांना जन धन योजनेंतर्गत बँक खाती सुरु करुन देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक कारागृहात दररोज एक तास योग वर्ग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.